क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचेही जोरदार प्रत्युत्तर : केला चीन दौरा रद्द
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारताने जोरदार विरोध केला आहे. चीनमधील होंगझाऊ येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेला 23 सप्टेंबरपासून अधिकृत सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, हे तीनही खेळाडू अरुणाचल प्रदेशातील आहेत. यावर आता भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बिजिंग दौरा रद्द केला आहे. ठाकूर भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी चीनला जाणार होते. या स्पर्धेचा 23 सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. पण त्यांनी हा दौरा रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशू खेळात सहभागी होणार होते. न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मापुंग लामगु अशी या तीन खेळाडूंची नावे आहेत. या स्पर्धेला आशियाई इव्हेंट कमिटीने या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली होती. परंतु दोन खेळाडू त्यांचे मान्यतापत्र डाऊनलोड करू शकले नाहीत, जे चीनमध्ये प्रवेशासाठी व्हिसा म्हणून काम करतील. तिसऱ्या खेळाडूला मान्यतापत्र मिळाले होते. नंतर चीनकडून सांगण्यात आले की त्यांना हाँगकाँगच्या पलीकडे जाण्याची परवानगी नाही. वुशू स्पर्धा 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तिन्ही खेळाडूंना 24 सप्टेंबरपर्यंत हांगझोऊमध्ये पोहोचायचे होते, परंतु व्हिसाला विलंब झाल्यामुळे त्यांना आशियाई स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. वुशू संघाचे उर्वरित खेळाडू चीनला रवाना झाले आहेत. इतर खेळाडूंना कोणताही समस्या आली नाही पण या तीन खेळाडूंच्या बाबतीत हे प्रकरण घडल्याने भारताने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, आशिया ऑलिम्पिक काउंसिलचे प्रभारी अध्यक्ष रणधीर सिंग यांनी हे प्रकरण चीन सरकारपर्यंत नेण्यात येईल, असे म्हटले आहे. मात्र, उपाध्यक्ष वेई जिजहोंग म्हणाले की, भारतीय खेळाडूंना चीनमध्ये प्रवेशासाठी व्हिसा देण्यात आला आहे, पण तो खेळाडूंनी स्विकारण्यास नकार दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर अनुराग ठाकूर यांनी बिजिंग दौरा रद्द केला आहे. यावर आता अरुणाचलच्या खेळाडूंच्या बाबतीत कोणता निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.