रशियन भूभागाला दिले चिनी नाव : व्लादिवोस्तोक शहरावर वक्रदृष्टी
वृत्तसंस्था /बीजिंग/मॉस्को
भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या अनेक भूभागांना चिनी नाव देण्याची आगळीक केल्यावर चीनची अरेरावी वाढतच चालली आहे. चीनच्या नैसर्गिक संपदा मंत्रालयाने चीनने सोव्हियत काळात ज्या भूभागांना गमाविले होते, त्यांच्याकरता जुन्या चिनी नावांचाच वापर करण्यात यावा असा आदेश काढला आहे. हा भूभाग आता रशियातील दुर्गम पूर्व क्षेत्र म्हणून ओळखले जाते. याच भागात व्लादिवोस्तोक शहर असून ते रशियाचे प्रशांत महासागरातील प्रवेशद्वार आहे. युक्रेन युद्धानंतर रशिया एकप्रकारे चीनचा कनिष्ठ भागीदार ठरला आहे. तर अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी रशियाला चीनची मदत आवश्यक ठरली आहे. अशा स्थितीत चीनच्या पावलाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. रशियातील व्लादिवोस्तोक शहर रशियाच्या नौदलाच्या प्रशांत ताफ्याचे मुख्यालय आहे. चीनने आता या शहराला हैशेनवेई तर सखालिन बेटाला कूयेदावो हे नाव दिले आहे. तसेच रशियाच्या बोलशोई यूस्सूरियस्की बेटाला चीनच्या हद्दीत दाखविणारा नकाशाही जारी करण्यात आला आहे.
दीर्घकाळापासून सीमा वाद
रशियाच्या दुर्गम पूर्व क्षेत्रावर चीनने दावा केल्याने मोठा वाद उभा ठाकला जाण्याची शक्यता आहे. रशियाच्या दुर्गम पूर्व क्षेत्रात अमूरचे क्षेत्र देखील येते, जे चीनच्या सीमेला लागून आहे. तर अमूरनजीकच व्लादिवोस्तोक शहर आहे. याच भागाला 19 व्या शतकात रशियन जनरल निकोलाई मुराव इव अमूरस्की यांनी स्वत:चे बलाढ्या सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावर चीनला पराभूत करत ताब्यात घेतले होते. याच भूभागावरून रशिया आणि चीन यांच्यात अद्याप वाद आहे. 1969 दरम्यान चीन आणि सोव्हियत संघ यांच्यात 7 महिन्यांपर्यंत अघोषित युद्ध झाले होते. 1991 नंतर चीन आणि रशिया यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असून करारही झाले आहेत.
माओंनी दिली होती धमकी
अनेक करार होऊनही चीनच्या सर्व गटांनी त्याला मान्यता दिलेली नाही. चीनचा 15 लाख चौरस किलोमीटरचा भूभाग रशियाने बळकाविल्याचे चीनच्या पुस्तकांमधून अद्याप शिकविले जाते. रशियाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा माओंनी दिला होता. दुर्गम पूर्व क्षेत्रात हीरे आणि सोन्याच्या खाणी असून यावर चीनचा डोळा असल्याचे रशियन तज्ञांचे मानणे आहे. याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे मिळाले असून यांची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.
रशियाने भारताकडे मागितली मदत
चीनकडून होणारी आगळीक पाहता रशियाने भारतासोबत हातमिळवणी केली आहे. व्लादिवोस्तोकच्या आसपास भारताच्या मदतीने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच चेन्नईपासून व्लादिवोस्तोकपर्यंत मालवाहतूक सुरू केली जाणार आहे. या मालवाहतुकीच्या मार्गाचे अलिकडेच यशस्वी परीक्षण पार पडले आहे. भारताने व्लादिवोस्तोकमध्ये सॅटेलाइट शहर वसवावे, जेणेकरून चीनचा या भागात वाढणारा प्रभाव कमी व्हावा, अशी रशियाची इच्छा आहे.