वृत्तसंस्था/ बीजिंग
अमेरिकेचा तीव्र विरोध डावलून चीन तैवानवर हल्ला करण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. तैवानच्या विरोधात आपल्या सेनेचा सराव करण्याची घोषणा चिनी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे या भागातील तणाव वाढणार असून तैवाननेही चीनचा संभाव्य हल्ला परतविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने चीनला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
अमेरिकन काँग्रेसच्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांची तैवान भेट निश्चित आहे. चीनने या भेटीला तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच आगीशी खेळाल तर जळून जाल, असा इशारा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना फोनवरील चर्चेत दिला आहे. या घडामोडींमुळे एकीकडे रशिया-युपेन युद्ध सुरू असताना चीन आणि अमेरिका यांच्यातही सामरिक संघर्ष निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.