‘इंडिया’च्या नेत्यांकडून भीती व्यक्त : केंद्र-राज्य सरकारने मणिपूरवर दुर्लक्ष केल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यानंतर ‘इंडिया’ आघाडीचे खासदार रविवारी दिल्लीत परतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना तेथील परिस्थितीची माहिती देत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मणिपूरमधील जनता सध्या नरकयातना भोगत असून त्यांच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मणिपूरमधील अस्थिर वातावरणाचा चीन गैरफायदा उठवू शकते, अशी भीतीही ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.
विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरचा दोन दिवसांचा दौरा संपवून रविवारी दुपारी दिल्लीला परतले. तप्तूर्वी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राज्यातील जनतेच्या समस्यांची माहिती देणारे निवेदन सादर केले. तसेच हिंसाचार थांबवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. तसेच याप्रकरणी पंतप्रधानांनी मौन बाळगल्याने ते गंभीर नसल्याचे दिसून येते, असेही विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानंतर आता राजकारणही शिगेला पोहोचले आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी केलेल्या मणिपूर दौऱ्यानंतर भाजपने याला ‘नाटक’ असे म्हटले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी शनिवारी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेटी देऊन लोकांना होणाऱ्या त्रासाची माहिती घेतली. तसेच रविवारी ‘इंडिया’ आघाडीच्या शिष्टमंडळाने मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेतली. सर्व खासदारांनी राज्यपालांना मणिपूरमध्ये गेल्या 89 दिवसांपासून ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल केंद्र सरकारला योग्य माहिती पुरविण्याची विनंती केली.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मणिपूर हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला. सीमावर्ती राज्यातील अशांततेचा चिनी सैनिक गैरफायदा घेऊ शकतात यावर त्यांनी भर दिला. मणिपूरचे दोन भाग झाले आहेत. सरकारला परिस्थिती समजत नाही. म्यानमारशी फक्त 75 किलोमीटरवर सीमारेषा असून चीन अगदी थोड्या अंतरावर आहे. ही चिंताजनक स्थिती असून आता देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नात राजकारण न करता सरकारने रितसर लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्राचे मणिपूरकडे दुर्लक्ष : अधीर रंजन चौधरी
मणिपूरहून परतल्यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मणिपूरसाठी कोणतीही मोठी पावले उचलत नाहीत. तेथील लोकांच्या घरात अन्न आणि औषधे नाहीत, मुलांना शिक्षणासाठी कोणतीही सुविधा नाही. राज्य आणि केंद्र सरकारने डोळे मिटून बसले असून त्यांनी मणिपूरच्या जनतेला एकटे सोडले असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करावी असे सांगत राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने परिस्थिती बिकट होत असल्याचे अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले.
एका हॉलमध्ये 500 लोकांना आश्रय
काँग्रेस खासदार फुलोदेवी नेताम यांनी सांगितले की, मदत शिबिरांना भेट दिल्यानंतर एका हॉलमध्ये 400-500 लोक राहत असल्याचे दिसून आले. राज्य सरकार त्यांना फक्त डाळ-भात देत आहे. मुलांना दिवसभर खायला काहीच मिळत नाही. टॉयलेट किंवा बाथरूमची सोय नाही. छावण्यांमधील व्यवस्था अतिशय हृदयद्रावक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही भेट द्यावी
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे राजदचे खासदार मनोज झा विमानतळावर म्हणाले. आमची एकच मागणी आहे की दोन्ही समुदायांनी एकोप्याने राहावे. मणिपूरमधील परिस्थिती वेदनादायक आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मणिपूरला भेट द्यावी, अशी चर्चा यापूर्वीच संसदेत झाली आहे. एनडीए आघाडी आणि पंतप्रधान मोदींनीही मणिपूरला भेट द्यावी, असे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई म्हणाले.
‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने चुराचंदपूर, मोइरांग आणि इंफाळच्या मदत शिबिरांना भेट दिली आहे. तिथे हिंसाचार पीडितांशी चर्चा करत त्यांच्या व्यथा, कथा, घटना जाणून घेतल्या. तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे गेल्या काही दिवसांतील गोळीबार आणि जाळपोळीच्या घटनांनी सिद्ध झाले आहे. मदत छावण्यांमध्ये परिस्थिती बिकट आहे. मुलांना विशेष काळजीची नितांत गरज असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात आले आहे. तीन महिन्यांपासून इंटरनेटवरील बंदीमुळे निराधार अफवांना चालना मिळत आहे. त्यामुळे अविश्वास वाढला आहे. 89 दिवसांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असे अनेक दावे यावेळी करण्यात आले.