वृत्तसंस्था/ शेनझेन
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे चायना मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी चायना बॅडमिंटन स्पर्धेतील बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीचा आढावा पात्रतेसाठी घेतला जातो.
चीनमधील होणाऱ्या या स्पर्धेत पुरूष विभागात एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. एच. एस. प्रणॉयला अलिकडेच झालेल्या जपान खुल्या 500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सेनचा या स्पर्धेतील सलामीचा सामना तैवानच्या चेनशी होणार आहे. भारताचे लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत हे पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे दुहेरीचे विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. महिलांच्या विभागात ऋतू पर्णा आणि श्वेत पर्णा या पांडा भगिनी दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महिला एकेरीत आकर्षी काश्यप ही एकमेव बॅडमिंटनपटू भारतातर्फे खेळणार आहे.