संरक्षण मंत्र्यांचा भेटीचा प्रस्ताव नाकारला : प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे अमेरिकेचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनने अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिलेले भेटीचे निमंत्रण नाकारले आहे. यासंबंधीची माहिती पेंटागॉनने दिली आहे. अमेरिकेने चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांना चालू आठवड्यात सिंगापूरमध्ये भेटीसाठी निमंत्रित पेल हेते.
फेब्रुवारी महिन्यातील हेरगिरी करणाऱ्या फुग्यांसंबंधीच्या वादापासून चीनने अमेरिकेसोबतची चर्चा रोखली आहे. चीनच्या सैन्याने चर्चेत भाग घेण्यास नकार दिला असला तरीही चिनी सैन्यासोबत चर्च करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील असे पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी म्हटले आहे.
चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांना अमेरिकेने भेटीसाठी आमंत्रित केले होते. परंतु अमेरिकेने 2018 साली शांगफू यांच्यावर निर्बंध लादले होते. रशियाकडून शस्त्रास्त्रs खरेदी केल्याप्रकरणी अमेरिकेने ली यांच्यावर निर्बंध लादले होते. चीन गाठीभेटी टाळण्यासाठी केवळ कारणे देत आहे. चीनने आतापर्यंत अमेरिकेचे चर्चेचे अनेक अर्ज फेटाळल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने केला आहे.
फोनवरून बोलणेही टाळतोय
चीन आणि अमेरिकेमधील चर्चा कुठल्या स्तरापर्यंत बंद झाली आहे याचा अंदाज अमेरिकेचे अधिकारी एली रॅटनर यांच्या वक्तव्याद्वारे लावता येतो. चीनसोबत चर्चा करण्यासाठी आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आमचे फोन कॉल, मीटिंग्स आणि संवादावरून कुठलेच उत्तर मिळत नाही. चीन दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या सचिव स्तरीय चर्चेत सामील होण्यासाठी टाळाटाळ करतोय असे रॅटनर यांनी म्हटले आहे.
हेरगिरी करणाऱ्या फुग्यांची पार्श्वभूमी
फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने चीनवर स्पाय बलूनद्वारे हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे. अमेरिकेने 5 फेब्रुवारी रोजी चिनी फुगा नष्ट केला होता. तसेच याचे अवशेष चीनला परत करण्यास नकार दिला होता. यामुळे चीन भडकला होता. कुठलाही बलून अन्य देशाच्या हवाईक्षेत्रात जाणे सामान्य बाब आहे. 2022 पासून आतापर्यंत 10 अमेरिकन बलून्स चीनमध्ये दाखल झाले आहेत असे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले होते. तर स्पाय बलूनच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी स्वत:चा चीन दौरा रद्द केला होता.