चीन सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असलेल्या राजकीय नेत्यांपासून सावध राहण्याचे धोरण तेथील राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी अवलंबिले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनाच अलीकडे डच्चू दिल्याचे समजते. गेल्या 2 वर्षात चीनमध्ये नेतेमंडळी, वरिष्ठ अधिकारी गायब होण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसते आहे. भ्रष्टाचार व इतर आरोपांखाली यांचा पत्ता कट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये नेते मंडळी आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी गायब होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. गायब झालेल्या या अधिकाऱ्यांना नंतर चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग त्यांना पदावरून काढून टाकतात. गेल्यावर्षी इंटरपोलचे प्रमुख गायब झाल्यानंतर त्याचा पत्ता कापण्याच्या प्रकारांना शीच्या राजवटीत स्थान राहत नाही. पुढे त्यांना नरक यातनांचा सामना करावा लागतो. जिन पिंग यांना आपल्या खुर्चीच्या रक्षणार्थ अशाप्रकारची खेळी करावी लागत असते.
चीनी परराष्ट्र मंत्री क्वीन गांग यांनी जिन पिंग सरकारचे परराष्ट्र धोरण आक्रमकपणे राबविण्यास सुरुवात केली होती. गेल्या डिसेंबर 2022 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. तत्पूर्वी ते 17 महिने अमेरिकेत चीनी राजदूत म्हणून काम पाहत होते. राजदूत म्हणून केवळ 17 महिने काम केलेले असताना त्यांना परराष्ट्रमंत्री करण्यात आल्याने ते राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्याशी त्यांची जवळीक असल्याचे दिसून आले. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांची जून महिन्यात घेतलेली शेवटची भेट ठरली. त्यानंतर गांग जूनपासून गायब झाले होते. जुलै महिन्यात झालेल्या आशियाई परराष्ट्र मंत्र्यांच्या शिखर बैठकीला त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. ते गायब झाल्यानंतर चीन सरकारकडून ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना परराष्ट्र मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. चीन सरकारमध्ये सर्वोच्च पदावर असलेल्या राजकीय नेत्यांपासून सावध राहण्याचे धोरण तेथील राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी अवलंबिले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनाच डच्चू दिला.
केवळ सात महिन्यांपूर्वीच क्विन गांग यांची परराष्ट्र मंत्रीपदावर नियुक्ती करण्यात आली होती. चीनमधील सर्वोच्च पदावरील राजकीय नेत्यांत 57 वर्षिय गांग युवा नेते ठरले होते. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या विदेशातील चीनी मिशनमध्ये सहभाग घेतला होता. यात 1995 ते 2011 या काळात त्यांची ब्रिटनमधील राजदूतावासात तीनवेळा नियुक्ती झाली होती. तसेच 2006 आणि 2014 मध्ये चीन परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी कार्य केले होते. आठ महिन्यांपूर्वी परराष्ट्र मंत्रीपदाचा कारभार हाती घेण्यापूर्वी ते 17 महिने अमेरिकेत चीनी राजदूत म्हणून कार्यरत होते.
राजदूत म्हणून कार्यरत असताना अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारातील अडचणी दूर करण्यात ते यशस्वी ठरले होते. मात्र परराष्ट्र मंत्री पदाच्या काळात त्यांची काही वैयक्तीक प्रकरणे बाहेर पडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांनी त्यांना गृहकैदेत ठेवले व नंतर अंतर्गत चौकशीत ते दोषी ठरल्यानंतर त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले.
परराष्ट्र मंत्री क्विन गांग यांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पिपल्स लिबरेशन आर्मीतील रॉकेट फोर्सचे प्रमुख जनरल ली युचाओ आणि त्याचे कनिष्ठ सहकारी जनरल लिऊ गुआंगबिन यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले असल्याचे समजते. त्यांच्या जागी माजी नौदल उपप्रमुख वांग हौबिन यांची रॉकेट फोर्स प्रमुख आणि कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य झु झीशेंग यांची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या 96 स्थापना दिनापूर्वी अर्थात 1 ऑगस्टपूर्वी मोठे बदल घडवण्यात आले.
निलंबित केलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांवर आता भ्रष्टाचाराचे आरोप ठेऊन कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी अशाच दोन लष्करी अधिकाऱ्यांवर 2014 साली भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन कारवाई करण्यात आली होती. यात एका अधिकाऱ्याला लष्कराच्या मार्शल कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तर दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा खटला सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग आता बलाढ्या चीनी नेते बनले असून त्यांना सातत्याने आपल्यावर कोणी कुरघोडी करु नये यासाठी सतर्क राहावे लागते. त्याच्या विरोधात कोणी जाऊ नयेत यासाठीच ते अशाप्रकारच्या कारवाया करत असतात.
प्रशांत कामत