पाकिस्तानात सुरक्षेची चिंता ः सीपीईसी प्रकल्पासंबंधी मोठा निर्णय
वृत्तसंस्था/ ग्वादार
सीपीईसी प्रकल्पावर काम करणाऱया सर्व चिनी कामगारांना पाकिस्तानच्या सरकारने बुलेटप्रूफ कार उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात असलेले सर्व चिनी कामगार आता प्रकल्पाबाहेर जाण्यासाठी सदैव बुलेटप्रूफ वाहनांचा वापर करू शकणार आहेत.
सीपीईसी प्रकल्पावर काम करत असलेल्या चिनी कामगारांवर हल्ला होण्याचा धोका आहे. याचमुळे चीनच्या सरकारने चिंता व्यक्त करत पाकिस्तान सरकारला सुरक्षा वाढविण्याची सूचना केली होती. चीनचा आग्रह मान्य करत पाक सरकारने सर्व चिनी कामगारांना बुलेटप्रूफ कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
13 जुलै रोजी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्या प्रांतात एक भीषण बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 13 चिनी कामगारांचा मृत्यू झाला होता. हे सर्व कामगार 4320 मेगावॅटच्या दासू जलविद्युत प्रकल्पावर काम करण्यासाठी जात होते. या कामगारांच्या बसला लक्ष्य करत बलूच संघटनांनी स्फोट घडवून आणला होता. या प्रकल्पाचे काम पाकिस्तानात चिनी कंपनी करत आहे. 13 जुलै रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर प्रकल्पाचे काम रोखण्यात आले होते. परंतु 26 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
सीपीईसी प्रकल्प
चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपीईसी) पाकिस्तानच्या ग्वादारला बंदरला चीनच्या शिनजियांग प्रांतातील काशगरशी जोडणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाकरता चीनने 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय)चा हिस्सा आहे. चिनी कामगारांना असलेला धोका या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा ठरत आहे.