ढिगाऱ्याखाली अडकलेले 60 हून अधिक लोक जखमी
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या उत्तरेकडील सियुदाद मादेरो शहरात एका चर्चचे छत कोसळण्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रार्थनेसाठी चर्चमध्ये 100 हून अधिक लोक उपस्थित असतानाच इमारतीचे छत कोसळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली काही लोक दबले गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे.
उत्तर मेक्सिकोमध्ये घडलेल्या या घटनेनंतर नॅशनल गार्ड, पोलीस, राज्य नागरी संरक्षण कार्यालय आणि रेड क्रॉस युनिटच्या जवानांनी लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळ गाठले होते. पोलीस आणि बचाव पथकाने तत्परता दाखवत 49 जणांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चार महिन्यांचे बाळ, तीन पाच वर्षांची मुले आणि दोन नऊ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. चर्चचे छत अचानक कोसळले तेव्हा अनेक लोक चर्चमध्ये जेवत होते, असे बिशप जोस अरमांडो अल्वारेझ यांनी सांगितले. भूकंपाच्या वेळी इमारती कोसळणे हे मेक्सिकोमध्ये सामान्य आहे. तथापि, नॅशनल सिस्मॉलॉजिकल सर्व्हिसने कोणत्याही भूकंपाच्या हालचाली झाल्याचा इन्कार केला आहे.