कृषीमंत्री चेलुवरायस्वामी यांच्यावरील कथित आरोपासंबंधी सरकारकडून गांभीर्याने दखल : पत्र बोगस असल्याचा संशय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याचे कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी राज्यपालांना पाठविलेल्या कथित पत्रासंबंधीच्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीआयडीकडे सोपवला आहे. सदर पत्र बोगस असल्याचा संशय असून त्यातील स्वाक्षऱ्याही एकाच व्यक्तीने केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्रावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
चेलुवरायस्वामी यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप करणारे पत्र मंड्या जिल्ह्यातील 7 कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपालांना पाठविल्याच्या वृत्ताने राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याने आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांनी राज्यपालांना पत्रच पाठविले नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसच्या गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन बोगस पत्र पाठविणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डॉ. परमेश्वर यांच्याशी चर्चा करून प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यास संमती दर्शविली.
चेलुवरायस्वामी यांच्याविरुद्ध मंड्या जिल्ह्यातील 7 तालुक्यांच्या साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांना पाठविण्यात आले होते. त्यामुळे राज्यपालांच्या विशेष सचिवांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून पत्रासंबंधी चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. तसेच तक्रारीसंबंधीच्या पत्राची मूळ प्रतही पाठविली होती. मंत्री चेलुवरायस्वामी यांच्याविरुद्ध 6 ते 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप राज्यपालांना पाठविलेल्या पत्रामध्ये करण्यात आला होता. लाच देण्याकरिता मंड्या जिल्हा कृषी संचालकांमार्फत दबाव आणण्यात येत आहे. लाच मागण्याच्या पद्धतीला आळा न घातल्यास कुटुंबीयांसमवेत विष प्राशन करू, असा इशाराही देण्यात आला होता. त्
मात्र, पत्रावर असणाऱ्या सर्व स्वाक्षऱ्या एकाच व्यक्तीने केल्याचा संशय निर्माण झाल्याने सरकारने हे प्रकरण गांभीर्याने विचारात घेतले आहे. तसेच या पत्राची शहानिशा करण्यासाठी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. रामनगरच्या कृषी विभागाचे सहसंचालक अशोककुमार यांनी आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेले नाही, अशी तक्रार केली आहे. त्यामुळे याविषयी तपास करून सत्य बाहेर काढण्याच्या सूचना दिल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
काँग्रेस-निजदमध्ये आरोप प्रत्यारोप
चेलुवरायस्वामी यांच्याविरुद्धच्या आरोपासंबंधी निजद नेते कुमारस्वामी यांनी जोरदार टीकाप्रहार केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर अधिकाऱ्यांकडून वसुली करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सिद्धरामय्या यांनी पलटवार केला आहे. निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून स्वत:ला लवकर सावरा. बिघडलेल्या मानसिक स्थितीतून बरे होऊन बाहेर या, अशी खोचक टिप्पणी सिद्धरामय्यांनी केली आहे. मंत्री चेलुवरायस्वामी म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांच्या नावाने पत्र पाठविणारे आपल्या खात्यातील नाहीत. त्यांची नावे आणि पत्ते बोगस आहेत. त्यांचे फोन नंबरही मिळालेले नाही. राज्यपालांच्या कार्यालयांना पाठविलेल्या पत्राविषयी चौकशी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींना सामान्य ज्ञान असायला हवे. आपल्यावर विनाकारण आरोप करणे थांबवावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.