अनगोळ-भाग्यनगर-विष्णू गल्ली, वडगाव येथील ब्लॅकस्पॉटचा समावेश : महापौर शोभा सोमणाचे यांच्यासह अधिकाऱ्यांचा सहभाग
बेळगाव : शहरातील जनता विविध चौकांमध्ये कचरा फेकत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत. यामुळे मोठी समस्या निर्माण होत असून महापालिकेने हे संपूर्ण ब्लॅकस्पॉट निर्मूलन करण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी महापौर शोभा सोमणाचे, नगरसेविका वाणी जोशी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनगोळ व भाग्यनगर येथील तो ब्लॅकस्पॉट हटविला. अनगोळ येथील मराठी शाळा क्रमांक 34 समोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचून राहात होता. या परिसरातील नागरिक त्या ठिकाणी कचरा आणून फेकत होते. शाळेसमोरच हा कचरा साचत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत होता. याची दखल घेऊन महापौर आणि कर्मचाऱ्यांनी तेथील ब्लॅकस्पॉट हटविला असून त्या ठिकाणी फलक उभारणी केली आहे.
कचरा फेकल्यास दंडात्मक कारवाई
भाग्यनगर, दुसरा क्रॉस येथेही ब्लॅकस्पॉट होता. त्या ठिकाणीही कचऱ्याचा ढीग साचून होता. मनपा कर्मचाऱ्यांनी तेथीलही कचरा हटवून त्या ठिकाणी फुलांची मोठी रांगोळी घातली होती. याचबरोबर या ठिकाणी कचरा फेकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वडगाव येथे फलक उभारुन कचरा न टाकण्याचे आवाहन
शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी हे प्रयत्न करत आहेत. शहरातील जवळपास 200 हून अधिक ब्लॅकस्पॉट हटविण्यात यश आले आहे. शुक्रवारी विष्णू गल्ली, वडगाव येथील ब्लॅकस्पॉट हटविण्यात आला आहे. त्या ठिकाणी फलक उभा करून कोणीही कचरा टाकू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांची धडपड सुरू आहे. शुक्रवारी विष्णू गल्ली, वडगाव येथील चौकात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला होता. तो कचरा हटवून त्या ठिकाणी फलक उभे करण्यात आले. याचबरोबर फुलांची रांगोळीही घालण्यात आली आहे. आरोग्य निरीक्षक कलावती अडमनी, सुभाष गराणी, किरण देमट्टी व इतर सफाई कर्मचाऱ्यांनी हा ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी प्रयत्न केले होते. याबद्दल या परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.