दगडफेकीमुळे गावात तणाव : 8 जणांवर जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा; तर पोलिसांकडून 60 जणांवर गुन्हा दाखल
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात वादावादीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत दोन्ही गटांना पांगवले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही दोन्ही गटांना सामोपचाराची भूमिका घेण्याचा सल्ला दिला असला तरी एका गटाकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री काही मित्रांमध्ये झालेल्या क्षुल्लक बाचाबाचीनंतर मारामारी झाली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी एका गटाने शुक्रवारी सकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उपस्थित राहून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. दोन्ही गटाकडून यावेळी संमतीही मिळाली होती. त्याचवेळी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तोपिनकट्टीत येऊन याबाबत विचारपूस केली होती.
यावेळी बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी रवी नाईक, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक फौजफाट्यासह याठिकाणी उपस्थित होते. चर्चा सुरू असतानाच अचानक दगडफेक सुरू झाल्याने जमाव बिथरून गेला. एकमेकावर दगडफेक सुरू करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत दोन्ही गटांना पांगवून लावले आणि परिस्थिती आटोक्यात आणली. यानंतर एका गटाने खानापूर पोलीस स्थानकात दुसऱ्या गटावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात सुनील गुरव आणि बबलू गुरव यासह इतर सहा जणांवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुनील गुरव आणि बबलू गुरव यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या 60 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टाळला असून तोपिनकट्टी गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या दगडफेकीत गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.