ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांना 10 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत.
मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात 10 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार प्रसाद लाड आणि इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्यापारी बिमल अग्रवाल यांनी लाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पण पुराव्यांअभावी लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली असून, तपास आता बंद करण्यात आला आहे. यामुळे भाजप पक्षासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे का असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.
प्रसाद लाड आणि हणमंत गायकवाड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे बीव्हीजी-क्रिस्टल नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीला मुंबई महापालिकेच्या जलसाठा आणि पंपिंग स्टेशनजवळ भिंत बांधण्याचे टेंडर मिळाले. अग्रवाल यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांनी हे काम त्यांना दिले. या कामाच्या मोबदल्यात अग्रवाल यांच्या कंपनीच्या वतीने लाड व गायकवाड यांना 5 टक्के रॉयल्टी देण्याचे ठरले. काम पूर्ण झाल्यावर लाड आणि गायकवाड यांनी निविदांची संपूर्ण रक्कम त्यांच्या संयुक्त कंपनीच्या खात्यात वर्ग करुन 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.