यजमान विंडीजविरुद्ध तिसरी व शेवटची वनडे आज
पोर्ट ऑफ स्पेन / वृत्तसंस्था
यजमान विंडीजविरुद्ध 3 सामन्यांची मालिका यापूर्वीच 2-0 फरकाने जिंकलेल्या भारतीय संघाचे आज तिसऱया व शेवटच्या सामन्यात क्लीन स्वीप हेच मुख्य टार्गेट असेल. भारताने या माध्यमातून विंडीजवर सलग 12 वा वनडे मालिकाविजय नोंदवला असून आता शेवटच्या वनडेत विजयी घोडदौड कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे.
सध्या सुरु असलेली मालिका यापूर्वीच जिंकली असल्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काही युवा खेळाडूंना आजमावणार का, याची उत्सुकता असेल. मात्र, राखीव खेळाडूंना संधी देत असतानाच समतोल संघबांधणी हा प्राधान्यक्रम त्यांना नजरेसमोर ठेवावा लागेल.
फलंदाजीच्या आघाडीवर, शुभमन गिलऐवजी ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाण्याची शक्यता कमी मानली जाते. शुभमनने या मालिकेतील 2 डावात 64 व 43 धावांचे योगदान दिले असून येथे स्थान अबाधित राहिल्यास धावांची आतषबाजी कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. ऋतुराजला यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत पूर्ण संधी मिळाली. मात्र, तो जलद गोलंदाजीला सामोरे जाताना बराच चाचपडत राहिला होता.
श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनी मागील सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली असून सूर्यकुमार यादव सलग दोन सामन्यात अपयशी ठरला असला तरी त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता कमी मानली जाते.
इशान किशन पॉवर प्ले ओव्हर्सदरम्यान उत्तम इनफिल्ड फटकेबाजी करु शकतो. पॉवर हिटर ही त्याची ओळख नसून ‘बेस्ट टायमर ऑफ द बॉल’ म्हणून त्याला वाखाणले जाते. पण, पॉवर हिटिंगच्या निकषावर मागे पडत असल्याने डावखुरा असूनही त्याच्याऐवजी संजू सॅमसनला पसंती मिळत आली आहे.
या मालिकेत रविंद्र जडेजा पहिल्या पसंतीचा अष्टपैलू होता. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो पहिल्या दोन्ही सामन्यात खेळू शकला नाही. आजही शेवटच्या लढतीसाठी तो उपलब्ध असणार का व असेल तर दुसऱया सामन्यात 64 धावांची विजयी खेळी साकारणाऱया अक्षर पटेलला वगळत जडेजाला निवडले जाणार का, हे पहावे लागेल. धवनला दोन डावखुरे फिरकीपटू खेळवायचे असतील तर मात्र चहलला विश्रांती देण्याचा निर्णय होऊ शकतो.
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत अर्शदीपला धोंडशिरेच्या दुखापतीने त्रस्त केले होते. पण, तो डावखुरा सीम बॉलर असल्याने येथे त्याला अवेश खानऐवजी खेळवले जाऊ शकते. यापूर्वी दुसऱया वनडे सामन्यात त्याला 6 षटकात एकही बळी न घेता 54 धावा मोजाव्या लागल्या होत्या. अवेश खान व प्रसिद्ध कृष्णा यांची गोलंदाजी शैली सर्वसाधारणपणे एकाच बॅक ऑफ लेंग्थ किंवा गुडलेंग्थ पद्धतीची आहे. या दोघांपैकी किमान एकाचा संघातील सहभाग जवळपास निश्चित असणार आहे.
संभाव्य संघ
विंडीज ः निकोलस पूरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), शमरह ब्रूक्स, किसी कार्टी, जेसॉन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, सीलेस, हेडन वॉल्श.
भारत ः शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण ः डीडी स्पोर्ट्स, फॅन कोड ऍप
सांघिक खेळ साकारला तरच विंडीजला विजयाची संधी
वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचे जोरदार धक्के बसलेल्या विंडीज संघाला आज आणखी एका पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी प्रामुख्याने सांघिक खेळावर भर द्यावा लागेल. विंडीजचा संघ शाय होप, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल व रोमारिओ शेफर्ड यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून असून यातील अपवाद वगळता अन्य खेळाडू अपयशीच ठरत आले आहेत. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे विंडीजला सांघिक खेळ साकारता आलेला नाही. आतापर्यंत त्यांनी सलग 8 वनडे गमावले असून ही मालिका खंडित करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.