महापालिकेची बैठक होणार असल्याने कौन्सिल विभागाची तयारी : महापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला
प्रतिनिधी /बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडणुकीची घोषणा झाल्याने महापालिकेच्या कौन्सिल विभागाच्या हालचाली वाढल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून विविध कारणासाठी वापरण्यात येत असलेल्या महापालिका सभागृहाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेची बैठक सभागृहात होणार असल्याने कौन्सिल विभागाने तयारी चालविली आहे.
महापालिका निवडणूक होऊन सव्वा वर्ष होत आले. महापौर-उपमहापौर निवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याकरिता महापालिका सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली बैठक होणार आहे. 21 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर निवड केली जाणार असल्याने आवश्यक तयारी कौन्सिल विभागाने सुरू केली आहे. प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी भाग्यश्री हुग्गी यांनी मंगळवारी महापालिकेतील विविध कक्षांची पाहणी करून माहिती घेतली. महापालिका सभागृहाचा वापर केवळ बैठकांसाठी करणे आवश्यक आहे. सभागृहाच्या वापराबाबत नियमावली निश्चित करण्यात आली आहे.
मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून सभागृहाचा वापर प्रत्येक बैठकीसाठी केला जात आहे. निवडणूक मतदारयादीचे काम असो किंवा कोणत्याही विभागाची बैठक असो या सर्व बैठका सभागृहात घेण्यात येत आहेत. त्यामुळे सभागृहाच्या प्रोटोकॉलची एwसी की तैसी झाली आहे.
अलीकडे मतदारयाद्या तयार करण्यासाठी सभागृहात कामकाज करण्यात येत होते. स्टँडिंग कमिटी मिटिंग हॉल असताना देखील सभागृहाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहात अस्वच्छता निर्माण झाली होती.
आसन सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश
सभागृहाच्या स्वच्छतेचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले होते. तसेच प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी भाग्यश्री हुग्गी यांनी महापौर-उपमहापौर कक्ष तसेच स्थायी समिती अध्यक्ष व सत्ताधारी-विरोधी गटाच्या कक्षांची पाहणी केली. याठिकाणी काही साहित्य ठेवण्यात आले होते. तसेच काही कक्ष अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे सर्व साहित्य हटविण्यासह अधिकाऱ्यांना अन्यत्र बसण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सर्व कक्ष स्वच्छ करून आसन सुविधा उपलब्ध करण्याचा आदेश कौन्सिल विभागाच्या अधिकाऱ्यांना भाग्यश्री हुग्गी यांनी बजावला. त्यामुळे हे काम मंगळवारी हाती घेण्यात आले.