गणेश विसर्जन केलेल्या तलावाची केली स्वच्छता : जवानांच्या कुटुंबीयांचाही सहभाग
बेळगाव : महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. 1 ऑक्टोबरपासून स्वच्छता हीच सेवा हे घोषवाक्य देऊन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये विविध ग्राम पंचायती, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या व्याप्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीकडून सावगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सावगाव ग्रामस्थ व मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांच्या साहाय्याने गावात नुकताच गणेश विसर्जन केलेल्या तलावाची स्वच्छता करण्यात आली. गणेश विसर्जनानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. यामुळे परिसर अस्वच्छ बनला होता. भविष्यात यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांना धोका लक्षात घेऊन इन्फंट्रीच्या जवानांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अग्निवीर जवानांनी सहभाग घेतला होता. तसेच सावगाव ग्रामस्थांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यानंतर इन्फंट्रीच्या जवानांकडून अरगन तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच मिलिटरी महादेव मंदिरासमोरील शिवतीर्थावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमध्ये जवानांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला होता.