पणजी : गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा, या मोहिमेस राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. संततधार पावसामुळे त्या मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या. तथापि मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, सरकारी खात्यातील कर्मचारी, शिक्षण संस्था, न्यायालये, पालिका, पंचायतीनी त्यात भाग घेवून आपापली कार्यालये साफ केली. सकाळच्या सत्रात सुमारे दोन-तीन तास हा उपक्रम चालला. त्यात जनताही सहभागी झाली असल्याने एकंदरीत ‘एका दिवशी, एका तासाची’ ही मोहीम राज्यात यशस्वी झाल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी पालिकेत तर कृषीमंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथे स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई तर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मिरामार येथे स्वच्छता मोहीम राबवली. सत्ताधारी आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विविध कार्यक्रम, उपक्रमातून स्वच्छता केली. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी वर्गाने शाळा, कॉलेज परिसर स्वच्छ करून तेथील कचरा साफ केला. रविवारची सुटी असताना देखील सर्वांनी स्वच्छता मोहीमेत भाग घेतला. मंदिरे, बाजाराची ठिकाणे येथेही साफसफाई करण्यात आली. सरकारी खाती कार्यालयात देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. संजय स्कुल एनसीसी, आकाशवाणी, पीआयबी, माहिती प्रसिद्धी खाते, आरोग्य केंद्रांनी स्वच्छता मोहीमेत भाग घेऊन आपापली कार्यालये, परिसरांची साफसफाई केली. अनेक खासगी संस्था, संघटना यांनीही स्वच्छता मोहीमेत भाग घेतल्याचे दिसून आले. भर पावसातही अनेकांनी साफसफाई मोहीमेत भाग घेतला. अनेकजण पाऊस असल्याने छत्री घेऊन, रेनकोट घालून या मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून आले.