सीईओ यांच्या सह अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला सहभाग
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत उचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम
उचगाव प्रतिनिधी
स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत १ ऑक्टोंबर रोजी एकाच वेळी सर्वत्र एक तास श्रमदान मोहिमे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत उचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात आले.
ग्रामपंचायत उचगाव येथे स्वच्छता श्रमदान उपक्रम झाला.‘ग्रामपंचायत कडील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी करणेसाठी, नागरिकांनी कचरा वर्गीकरण घरातच करावे. प्लास्टीक चा वापर कमी करावा.’ असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले. स्वच्छता मोहीमेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी स्वच्छता कर्मचारी यांचा सन्मान प्रशासक पाटील व सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून करण्यात आला. जि.प.चे माजी सदस्य महेश चौगुले, सुनिल पोवार उपस्थित होते. स्वच्छता ही सेवा अंतर्गत कचरा मुक्ती या विषयावर तयार केलेल्या गिताचे सादरीकरण कोल्हापूर जिल्हा परिषद, कर्मचारी कला मंचतर्फे करण्यात आले.
या श्रमदानासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, गट विकास अधिकारी विजय यादव, लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच वैजयंती यादव, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय धनगर यांच्यासह अन्य अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांनी संपूर्ण उचगाव मध्ये श्रमदान मोहीम राबवली.
पंधरा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा ह्या पंधरवडा कार्यक्रम मध्ये गावातील पर्यटन स्थळे व सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी स्वच्छता मोहीम झाली. शालेयस्तरावर विविध स्पर्धा ,सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच स्वच्छता रन असे कार्यक्रम झाले.
सुरुवातीस मंगेश्वर मंदिराच्या चौकात श्रमदान मोहिमे प्रसंगी स्वच्छतेचे महत्व तसेच प्रकाश लोहार यांचा पोवाडा, स्वच्छते विषयी गाणी आदी कार्यक्रम झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते कुमार विद्यामंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर स्वच्छतेसाठी चार वेगवेगळे ग्रुप करून मंगेश्वर गल्ली ते मुख्य रस्ता उचगाव कमान तसेच प्रियदर्शनी कॉलनी, मणेरमळा व शांतीनगर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसराची स्वच्छता केली.
यावेळी सीईओ संतोष पाटील यांनी उचगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छतेत मोठे योगदान असून उचगाव गावाची मोठी लोकसंख्या असूनही अतिशय चांगली स्वच्छता ठेवल्याबद्दल सरपंच मधुकर चव्हाण ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे कौतुक केले.स्वच्छता अभियानामध्ये ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी , ग्रामपंचायत सर्व सदस्य, माजी जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.