प्राथमिक शिक्षक संघटनेची बिम्सकडे मागणी
बेळगाव : शिक्षकांची वैद्यकीय बिले प्रलंबित असून ती लवकर मंजूर करावी, त्याचबरोबर बिम्समधील बील तपासणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने बिम्स प्रशासनाला करण्यात आली. अद्याप 500 ते 600 वैद्यकीय बिलांच्या फाईल प्रलंबित असल्याने शिक्षक तसेच इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे हाल होत असून ही बिले लवकर मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली. सरकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही आजार झाल्यानंतर त्याचे वैद्यकीय बिल सरकारकडे जमा करावे लागते. त्यानंतर बिलाची शहानिशा करून बिलाची रक्कम मंजूर केली जाते. यापूर्वी व्हॅक्सिन डेपो येथील जिल्हा वैद्यकीय अधिकारी कार्यालयात फाईलची चाचपणी होत होती. परंतु सध्या बेळगाव सरकारी मेडिकल कॉलेज (बिम्स) येथे फाईलची चाचपणी होते. यासाठी केवळ एकच कर्मचारी असून त्यांच्याकडून दररोज दहा फाईल तपासल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने फाईल तपासणीवर मर्यादा येत आहे. बेळगाव जिल्ह्यातून सर्व वैद्यकीय बिल फाईल एकाच ठिकाणी येत असल्यामुळे या विभागावरचा बोजा वाढला आहे. रुग्ण व त्यावर झालेले उपचार याची शहानिशा यादरम्यान केली जाते. काही वेळा खोटी बिले लावून पैसे उकळण्याचे प्रकारही घडत असल्याने काळजीपूर्वक बिलाची तपासणी करावी लागते. यामुळे फाईल तपासणी करण्यास वेळ होत आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास कामाची गती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी बिम्स अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कर्मचारी वाढविण्याचे अधिकार जिल्हा पंचायत कार्यालयाकडे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा पंचायत सीईओची भेट घेतली जाणार आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी, सेक्रेटरी गोणी, पदाधिकारी कृष्णा राचण्णावर, शहरअध्यक्ष बाबू सोलगण्णावर, कार्याध्यक्ष राजू बचनट्टी, जैनोजी, राजू कोलकार यासह इतर उपस्थित होते.