पुणे विभागातील वैद्यमापन शास्त्र विभागातील सहनियंत्रक डॉक्टरला 31 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
डॉ. ललित बैनीराम हारोळे (वय 55) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, वर्ग एकचे ते अधिकारी आहेत. याबाबत एसीबीकडे इस्लामपूर येथील वैद्यमापक शास्त्र विभागातील एका 54 वर्षीय निरीक्षकांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे इस्लामपूर येथे नेमणुकीस असून, त्यांच्याकडे इस्लामपूर विभाग तसेच कराड-1, कराड-2 व सातारा-2 अशा तीन विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. डॉ. ललित हारोळे हे त्यांचे विभागीय प्रमुख असून तक्रारदार यांच्या विभागाच्या हद्दीत होणारी पडताळणी व मुद्रांकनाबद्दल प्रत्येक निरीक्षक विभागाप्रमाणे दरमहा चार हजार रुपये हफ्ता याप्रमाणे एकूण 16 हजार रुपये लाचेची मागणी आरोपीने केली होती. त्यानंतर याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची एसीबीच्या पथकाने पडताळणे केली असता डॉ. ललित हारोळे यांनी इस्लामपूर हद्दीत होणारी पडताळणी व मुद्रांकनाच्या बद्दल तक्रारदाराकडे असलेले चार निरीक्षक विभागाचे दरमहा हफ्ता चार हजार रुपये प्रमाणे एकूण 16 हजार रुपये व कराठ विभागाचे कार्यक्षेत्रातील डायमंड शुगर वर्क कंपनीचे स्टोर कॅलीब्रेशनचे तीन टँकसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण 15 हजार रुपये असे एकूण 31 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदर रक्कम पुणे विभागाचे येरवडयातील वैद्यमापन शास्त्र विभागात डॉ. ललित हारोळे घेत असताना त्यांना एसबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांचेवर येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर हे याबाबत पुढील तपास करत आहे.