नवजात बालकांसाठी त्यांच्या मातेचे दूध हा सर्वोत्तम आहार असतो, हे शास्त्रीय तत्व सर्वपरिचित आहे. डॉक्टर्स नवीन आई झालेल्या प्रत्येक महिलेला हाच सल्ला देतात. मूल जन्माला आल्यानंतर पहिले सहा महिने त्याला मातेचे दूधच आहार म्हणून द्या अशा जाहीराती सरकारच्या वतीनेही प्रसिद्ध होत असतात. तथापी, आईच्या दुधाची कॉफी तयार केली जाणार आहे, असे आपल्याला कोणी सांगितले, तर ते खरे वाटण्याची शक्यता सुतराम नाही. तथापि, असा प्रकार घडला आहे.
रशियातील एक शहर पर्म येथील एका कॉफीपानगृहाच्या मालकाने अशी कॉफी बनविण्याची योजना तयार केली आहे. त्याने या कॉफीला ‘स्माईल’ असे नाव दिले आहे. नुकतेच ज्या महिलांनी मूल जन्माला घातले आहे अशा महिलांचे दूध विकत घेऊन त्याची कॉफी करण्याचा उपक्रम सुरु करण्याचा त्याचा विचार आहे.
अर्थातच, त्याच्यावर चहूकडून टीकेचा भडिमार होत आहे. मातेचे दूध हे केवळ तिच्या नवजात अपत्यासाठी असते. त्याच्यापासून पदार्थ बनवून ते विकणे अनैतिकच नव्हे, तर अन्यायकारक आहे. कारण ज्या मातेचे दूध विकत घेतले जाते, तिच्या अपत्याला त्यापासून वंचित तरी रहावे लागते किंवा ते अपत्याला अपुरे पडते. अपत्यावर असा अन्याय करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मातांनीही अशा प्रकारे आपले दूध विकून पैसा मिळविणे निदंनीय आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांना व्यक्त केल्या आहेत. या कॉफीची किंमतही अर्थात जास्त आहे. पण लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत असल्याने खरोखरच असे काही करण्याचे धाडस या कॉफी विक्रेत्याला होईल का असाही प्रश्न विचारला जात आहे.