आपल्या आयुष्याची एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क 58 वर्षे रानोमाळ आणि डोंगरदऱ्यांमधून भटकणाऱ्या एका निसर्गप्रेमी व्यक्तीची ही कहाणी आहे. आज ही व्यक्ती 81 वर्षांची आहे. तथापि, तिला अद्यापही चष्मा लागलेला नाही. तसेच अन्य कोणताही आजार किंवा विकार नाही. बिहारच्या जमुई जिल्ह्याचे रहिवासी अर्जुन मंडल यांची ही कहाणी आहे. त्यांना तरुण वयापासूनच वने, डोंगर, दऱ्या यांचा छंद होता. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षांपासून एक महत्वाचा उपक्रम केवळ स्वबळावर आणि कोणाचेही कसलेही साहाय्य न घेता केला आहे.
ते बिहार आणि आसपासच्या वनांमध्ये गेली 58 वर्षे भटकले. डोंगर-दऱ्या पालथ्या घातल्या. मात्र ते नुसतेच फिरले नाहीत. तर त्यांनी या वनांमधून तब्बल 20 हजारांहून अधिक औषधी वनस्पती शोधून काढल्या. त्यांच्या बियाण्यांचा संग्रह केला. यांमधील अनेक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र अर्जुन मंडल यांनी या वनस्पतींचे संग्रहण करुन त्यांना जीवनदान दिले आहे. इतकेच नव्हे, तर ते या वनस्पींचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करीत आहेत. आता या वनस्पतींची लागवड करुन त्या इतरांना उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आजवर अज्ञात असणाऱ्या अनेक वनस्पतींचा शोध लावून त्यांचे औषधी आणि आहारातील उपयोगही त्यांनी सिद्ध केले आहेत. वन्य वनस्पतींचे इतके मोठे संग्रहण आजवर भारतात तरी कोणत्याही एका व्यक्तीने केलेले नाही. मंडल यांचा हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
देशाच्या सरकारनेही त्यांच्या या कार्याची वाखाणणी केली असून त्यांना पुरस्कार घोषित केला आहे. हा पुरस्कार त्यांना येत्या 12 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. मंडल यांची स्वत:ची बाग असून त्यांनी या बागेत स्वत: धुंडाळलेल्या 20 हजारहून अधिक वनस्पतींची लागवड केली आहे.