10 एकर जागेत विविध सरकारी कार्यालये एकाच इमारतीत वसविली जाणार
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयासाठी बहुमजली मिनी विधानसौध उभारण्यात येणार आहे. या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला असून इमारत बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माती परीक्षण सुरू करण्यात आले आहे.
सध्या असणारे जिल्हाधिकारी कार्यालय जीर्ण झाले असून जागेचा अभाव निर्माण होत आहे. यासाठी अद्ययावत स्वरुपातील सुसज्ज इमारत उभारणीचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सहा मजली इमारत होणार असून यामध्ये पार्किंग व्यवस्था तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सध्या कार्यरत असणारी विविध सरकारी कार्यालये एकाच इमारतीत वसविली जाणार आहेत. या अनुषंगाने सदर इमारत उभारण्यात येणार आहे.
जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीच याची घोषणा केली आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच जागा संपादन करण्यात येणार आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तालुका पंचायत, महसूल खाते, भूमापन खाते, उपनोंदणी कार्यालय, काडा, मागासवर्गीय कल्याण खाते आदी इमारती आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे 10 एकर जमीन असून सदर जमिनीमध्ये ही कार्यालये आहेत. या कार्यालयांचाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच समावेश करण्याच्यादृष्टीने नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीही जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.
उपनोंदणी कार्यालयाशेजारी खोदाई करून माती परीक्षण करण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे लवकरच जुन्या इमारती हटवून नवीन इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. माती परीक्षण करून अहवाल देण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
लवकरच कामाला सुरुवात होणार
नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी माती परीक्षण केले जात आहे. यानंतर आराखड्याला मंजुरी मिळवून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी आणखी काही प्रक्रिया असून त्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
-रमेश मेत्री-अभियंते, सार्वजनिक बांधकाम खाते