कडोली शेतजमीन गैरप्रकार, तपास करून अहवाल देण्याची सूचना
बेळगाव : कडोली येथील शेतजमिनीवर बेकायदेशीरपणे नावे नोंदविल्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तालुका तहसीलदारांना नोटीस बजावली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. कडोली येथील शेतकरी भावकाण्णा पाटील व मारुती पाटील यांना आपल्या वारसाप्रमाणे असणाऱ्या शेतजमिनीवर नावे नोंदविताना वगळण्यात आले आहे. शेतजमिनीवर बेकायदेशीरपणे नावे नोंदविण्यात आली आहेत. यामुळे आपण भूमीहीन झालो आहोत. वडिलोपार्जित जमिनीवर आपलाही हक्क असून कायदेशीरप्रमाणे वारसा न करता पुतण्याकडून आमची नावे वगळून स्वत:चे नाव चढविण्यात आले आहे. यामध्ये गावपातळीवरील अधिकाऱ्यांकडूनही अन्याय करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका तहसीलदारांना नोटीस बजावली.
भावकाण्णा पाटील व मारुती पाटील यांच्या शेतजमिनीसंदर्भातील झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, बेकायदेशीरपणे नावे नोंदविल्या प्रकरणाचा तपास घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व याचा अहवाल देण्यात यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना बजावलेल्या नोटिसीत नमूद आहे. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गावपातळीवरील अधिकाऱ्यांना सदर प्रकरण चांगलेच शेकणार असल्याची शक्यता आहे. अनेकवेळा गावपातळीवरील अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून अन्याय करत आहेत. यामुळे जमिनीच्या वादाची प्रकरणे वाढत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे अधिकाऱ्यांना चाप बसणार का? हे पहावे लागणार आहे.