मनपा आयुक्तांसमवेत दिलेल्या भेटीवेळी कॅन्टोन्मेंट सीईओंशी चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट शाळेच्या आवारात सुसज्ज असे टर्फ फुटबॉल मैदान उभारण्यात आले आहे. अशाच पद्धतीचे मैदान महापालिका व्याप्तीमध्ये निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. याकरिता महापालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी शुक्रवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयाला भेट दिली. तसेच येथील मैदानाची पाहणी केली.
कॅन्टोन्मेंट शाळेच्या आवारातील मैदान विनामोबदला टर्फ मैदान बनविण्यासाठी एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर हे मैदान निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या पद्धतीचे मैदान महापालिका व्यप्तीमध्ये निर्माण करण्याचा आटापिटा काहींनी चालविला आहे. याकरिता महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन मैदानाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी शुक्रवारी दुपारी कॅन्टोन्मेंट कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद के. यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी टर्फ फुटबॉल मैदानाच्या कराराची माहिती घेऊन मैदानाची पाहणी केली. सोशल क्लबच्या माध्यमातून सदर मैदानाचा वापर केला जाणार आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या जागेत टर्फ फुटबॉल मैदान निर्माण करण्याचा विचार करण्यात आला. यादृष्टीने मैदानाची पाहणी करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मनपाची जागादेखील विनामोबदला मैदान बनविण्यासाठी देणार का?
कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. तसेच तीन माध्यमांच्या शाळा चालविल्या जात असून 1500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचा विचार न करता शाळेचे मैदान खासगी कंपनीला विनामोबदला देण्यात आले आहे. आता याच पद्धतीने मनपाची जागादेखील विनामोबदला मैदान बनविण्यासाठी देणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.