महिला विश्वचषक फुटबॉल : जमैका, डेन्मार्क यांचे स्पर्धेतील आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ मेलबर्न, सिडनी
2023 सालातील फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत कोलंबिया आणि ऑस्ट्रेलिया संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोलंबियाने मंगळवारी झालेल्या सामन्यात जमैकाचा 1-0 तर ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचा 2-0 असा पराभव केला.
कोलंबिया आणि जमैका यांच्यातील मंगळवारचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. कोलंबियाच्या महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता कोलंबिया आणि विद्यमान युरोपियन चॅम्पियन इंग्लंड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळवला जाईल. कोलंबियाच्या महिला फुटबॉल संघाला 2019 ची महिलांची विश्वकरंड फुटबॉल स्पर्धा हुकली होती. त्यानंतर या संघाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाने सुरू असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आपल्या कामगिरीत अधिक सुधारणा करत शेवटच्या आठ संघात स्थान मिळवले आहे. कोलंबिया संघाने आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळवले आहे. दरम्यान या स्पर्धेत जर्मनीकडून कोलंबियाला यापूर्वी पराभव पत्करावा लागला होता पण त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन या स्पर्धेत केले आहे.
या सामन्यातील एकमेव विजयी गोल कोलंबियाच्या कॅटालिना उस्मेने केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी वेगवान आणि शिस्तबद्ध खेळावर अधिक भर दिला होता. दोन्ही संघांनी या कालावधीत गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. मात्र 51 व्या मिनिटाला कॅटालिना उस्मेने जमैकाच्या बचावफळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत अप्रतिम गोल नोंदवला. या सामन्याला कोलंबियाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता कोलंबिया आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना येत्या शनिवारी सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.
फिफाच्या मानांकनात 43 व्या स्थानावर असलेल्या जमैका संघाला 2019 च्या स्पर्धेत तीन मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागल्याने त्यांचे आव्हान लवकरच समाप्त झाले होते. जमैकाप्रमाणेच कोलंबिया संघाने ऑस्ट्रेfिलयातील या स्पर्धेत फार मोठी अपेक्षा बाळगली नव्हती. मंगळवारच्या सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत कोलंबिया संघातील डायना ओस्पिनाचा खेळ सर्वात जलद आणि आकर्षक झाला होता. कोलंबिया संघातील लेसी सँटोज आणि उस्मे यांनी अनेकवेळा जमैकाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली होती. जमैका संघातील स्वेबाय आणि स्पिन्से यांना पंचांनी पिवळी कार्डे दाखवली. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत जमैका संघातील खेळाडूंनी कोलंबियाच्या गोलपोस्टपर्यंत वारंवार आक्रमणे केली पण त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. या विजयामुळे कोलंबियाचे या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिले आहे.
ऑस्ट्रेलिया विजयी
या स्पर्धेचे सहयजमान ऑस्ट्रेलियाने सिडनीत झालेल्या थरारक आणि अटीतटीच्या सामन्यात डेन्मार्कचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करत शेवटच्या आठ संघात स्थान मिळवले. उभय संघांकडून वेगवान आणि आक्रमक खेळ झाल्याने प्रेक्षक या सामन्यात बेहद्द खूष झाले होते. ऑस्ट्रेलियातर्फे कैटलिन फुर्ड आणि हेली रासो यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात अनुभवी सॅम केरचे पुनरागमन झाले. मध्यंतरी ऑस्ट्रेलियाची कर्णधार सॅम केर दुखापतीमुळे यापूर्वीच्या सामन्यात खेळू शकली नव्हती. सुमारे 75 हजार फुटबॉल शौकीन या सामन्यावेळी उपस्थित होते. 78 व्या मिनिटाला सॅम केरला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले त्यावेळी प्रेक्षकांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.
सामन्याचे निकाल
कोलंबिया वि. वि. जमैका
1-0
ऑस्ट्रेलिया वि. वि. डेन्मार्क
2-0