वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोनी आणि होंडा या दोन कंपन्यांनी एक संयुक्त करार केला असून या अंतर्गत आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची सेवा राबवली जाणार आहे. 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी दोन्ही कंपन्यांचे प्रयत्न राहणार आहेत.
सदरच्या दोन्ही कंपन्यांमध्ये मार्चमध्ये सहकार्याचा करार करण्यात आला असून दोन्ही कंपन्या प्रत्येकी 37.52 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम गुंतविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसाठी सोनी-होंडा मोबिलिटी या नावाने कंपनी स्थापली गेली असून या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली जाणार आहे. पर्यावरण सुरक्षेसंबंधीची पाऊले उचलतानाच व सुरक्षा तंत्रज्ञानाने युक्त इलेक्ट्रिक वाहने निर्मिती करण्याचा कंपनीचा इरादा आहे. यासोबत वाहन विक्री पश्चात ग्राहक सेवा देण्याची योजनाही दृष्टीपथात आहे, असे समजते. दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहन विक्री व विक्रीपश्चात सेवा याबाबतीत एकत्रित योगदान देतील.
2025 ला येणारी पहिली इलेक्ट्रिक कार
दरम्यान उभय कंपन्यांना एकत्रित विकासातून पहिलीवहिली इलेक्ट्रिक कार 2025 मध्ये बाजारात आणायची आहे. पण त्याआधी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी संबंधीतांची परवानगी मिळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.