तालुक्यात नर्सरींच्या माध्यमातून उद्योग देण्याचा प्रयत्न : उचगाव, कडोली, मुत्नाळ येथे कामाला प्रारंभ : रोपटी तयार करण्यास सुरुवात
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून अनेकांना सबलीकरणाचे धडे दिले जात आहेत. या माध्यमातून रोजगार देण्यासाठी अधिकारी धडपडत आहेत. याचबरोबर महिला स्वावलंबी व्हाव्यात या हेतूने सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उद्योग खात्री योजना अनेकांना लाभदायक ठरत आहे. बेळगाव तालुक्यात आता नर्सरीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा अनेक महिलांना होत आहे. ग्राम पंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या जागेमध्ये महिलांसाठी नर्सरींची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येत आहे. तर काही अनुदान महिलांनी खर्च करून नर्सरी उभा करावयाची आहे. सध्या तालुक्यात मुत्नाळ, कडोली, उचगाव या ठिकाणी नर्सरींची उभारणी करण्यात येत असून त्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर बेकिनकेरे येथे नर्सरी उभारण्यासाठी विचारविनिमय करण्यात येत आहे. सध्या मुत्नाळ येथे मोठ्या प्रमाणात कामाला गती देण्यात आली आहे.
विशेष करून स्व-साहाय्य संघातील महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. नर्सरीच्या माध्यमातून औषधी व ऑक्सिजनपूरक रोपटी लावण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येते. याचबरोबर ही रोपटी विक्री करून अथवा वन विभागाला देऊन त्या माध्यमातून उत्पन्न मिळविता येते. याचबरोबर यासाठी सरकारकडून ही रोपटी खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून महिलांना रोजगारांबरोबरच आर्थिक स्तरही उंचाविण्यास मदत मिळणार आहे. तालुक्यातील तीन ग्राम पंचायतींमध्ये सध्या नर्सरी उभारणीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत. याचबरोबर ही रोपटी उद्योग खात्रीतून रस्त्याशेजारी अथवा तलाव व इतर सुशोभिकरणासाठी लावली जाणार आहेत. यासाठी तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यात सध्या मुत्नाळ येथे रोपट्यांची विक्रीही सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांनीही गांभीर्याने घेऊन ही रोपटी कशाप्रकारे विक्री होतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
2 लाखाचे अनुदान
उद्योग खात्री योजनेतून यासाठी 2 लाख रुपये अनुदान मिळते. तर महिला सबलीकरणाच्या माध्यमातून महिलांनी 50 हजार रुपये खर्च करून ही नर्सरी उभा करायची आहे. याचबरोबर या नर्सरीला जागा ग्राम पंचायतीने द्यावयाची आहे. याची मंजुरी मिळाल्यास सुमारे 5 ते 10 हजार झाडांच्या रोपट्यांची उगवण करणे शक्य आहे. उद्योग खात्रीतून देण्यात येणारी रक्कम यामधून बियाणे, प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्य देण्यात येते. त्यामुळे आता याला गती मिळत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दोन ते तीन ग्राम पंचायतीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास उर्वरित ग्राम पंचायतींनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न
तालुक्यातील तीन ग्राम पंचायतींमध्ये नर्सरी स्थापण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यामधील दोन ग्राम पंचायतींमध्ये रोपट्यांची उगवणही झाली आहे. विशेष करून मुत्नाळ ग्राम पंचायतीच्या हद्दीत अधिक प्रमाणात कामाला चालना देण्यात आली. याचबरोबर उचगाव व कडोली येथेही कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी ही रोपटी विक्री करून महिला सक्षम बनविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.
राजेश दनवाडकर, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी