पुणे / प्रतिनिधी :
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तीन रूपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात शिरसाठ यांना पुणे दिवाणी न्यायालयाने समन्स बजावले आहे. न्यायाधीश वाय. एल. मेश्राम यांनी हे समन्स बजावले आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अंधारे यांनी ऍड. तौसीफ शेख, ऍड. क्रांती सहाने, स्वप्नील गिरमे यांच्यामार्फत न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने आमदार शिरसाठ यांना समन्स बजावले आहे. त्यांना 13 जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दाखल याचिकवेर म्हणणे मांडण्यासाठी प्रतिवादासंदर्भातील सर्व कागदपत्रेही सादर करण्याचे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.