गेले दहा दिवस देशभर आणि मराठी मुलखासह जगभर गणपती बाप्पा मोरयाचा गजर सुऊ आहे. गणपती बाप्पाच्या मोहक मूर्ती आणि देखणी-दिमाखदार सजावट यामुळे सारे वातावरण भाऊन गेले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीत गणेश उत्सव आणि शिवजयंती ही सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणात सुऊ झाली आणि दिसामाजी ती वाढताना दिसत आहे. यानिमित्ताने गणपतीची मंदिरे चकाचक होतात. रांगोळीपासून रसवंतीपर्यंत आणि मूर्तीकलेपासून-मैफलीपर्यंत अनेक कला-गुणांचे दर्शन या काळात होते. दहा दिवसाचा उत्सव अनंत चतुर्दशी दिवशी समाप्त होतो. गणपतीचा, मोरयाचा जयजयकार करताना या अखेरच्या दिवशी ‘पुढील वर्षी लवकर या’ असा बाप्पांना निरोप देताना अनेकांना अश्रू
अनावर होतात. बाप्पाच्या हातावर निरोपाचे साखर, दही घालताना ती मूर्ती डोळ्यात साठवली जाते आणि डोळे पाणवले जातात व सर्वांना सुबुद्धी दे अशी या बुद्धिदात्याला प्रार्थना केली जाते. यंदाही आज अनंत चतुर्दशीला हा सारा सोहळा, उत्सव, उत्साह अनुभवायला मिळणार आहे. महानगरात तर सकाळी लवकर विसर्जन मिरवणुका सुऊ होतात आणि दुसऱ्या दिवशी दिवस उगवला तरी त्यांची रांग संपलेली नसते. प्रतिष्ठेचे, मानाचे गणपती त्यांच्या
परंपरा पाळत या विसर्जन मिरवणुकीचे महत्त्व अधोरेखित करत असतात. पुणे, मुंबई, नागपूर,
कोल्हापूर, मिरज, नाशिक येथील मिरवणुकी मोठ्या दिमाखदार आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या
असतात. जणू नेत्रोत्सव असतो. काही मंडळांच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये आणि पारंपरिक खेळ यांचे अनोखे दर्शन होत असते. या उत्सवातून अनेक कार्यकर्ते घडत असतात. यंदाही हा सोहळा त्याच उत्साहात, दिमाखात साजरा होतो आहे. लक्षावधी लोक मोरयाचा गजर करत आणि पुढील वर्षी लवकर या असा निरोप घेत बाप्पाला मिरवणार आहेत. गणेश उत्सव हा लोक उत्सव आहे. त्यावर कोणतीही मतलबी मुद्रा नाही आणि नसावी. ओघानेच तुझा तू वाढवी राजा या न्यायाने हा उत्सव बहरत आहे. कालानुऊप त्यात बदल होत आहेत. पण मुळ भावना, मूळ उत्साह आणि भक्तीभाव टिकून आहे. महाराष्ट्राचे जे वेगळेपण, अनेक क्षेत्रात जाणवते त्याचे मूळ या गणेश उत्सवात आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. कारण हा उत्सव कार्यकर्ते घडवतो. समाज सेवेचे संस्कार करतो. या उत्सवाचा आणि शिवजयंतीचा स्वातंत्र्य लढ्यालाही उपयोग झाला होता. कारण याच तालमीतील अनेक स्वातंत्र्यसैनिक देशप्रेमाने, समाजसेवेने भारावून उतरले हेते. गणपती ही बुद्धिची देवता तर आहेच पण 64 कलांची देवता आहे. ओघानेच या काळात आणि पुढे अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळते. प्रबोधनाचे, जागृतीचे विषय मिळतात. सहज जरी या उत्सवाकडे पाहिले तरी या दहा
दिवसात हजारो कोटीची उलाढाल होते. याच जोडीला मूर्तीकार आणि चित्रकार विविध ऊपात
बाप्पांना सादर करत असतात. फुलांचा, प्रसादाचा, सजावटीचा व्यवसाय या काळात बहरतो. पण याच काळात नृत्य, गायन, वादन, नाटक या कलांनाही व्यासपीठ मिळते. गीतरामायण आणि शंकर पाटील, द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथाकथनाचे आणि जे.एल.रानडे वगैरे भावगीत गायकांचे हजारो कार्यक्रम गणेश उत्सवात झाल्याचे इतिहास सांगतो. व्याख्याते, प्रवचनकार, प्रबोधनकार यांचे जसे कार्यक्रम होत तसे लोककलाकार, लोककलावंत यांचेही फड गर्दी खेचित. शाळामधून गणेश उत्सव साजरा होत असे. या शालेय गणेश उत्सवात लेखक, कवी, विचारवंत विद्यार्थ्यांना भेटत असत. जोडीला लेझीम आणि पाठांतर असे संस्कार होत असत. वेगवेगळ्या चाळीत आणि कोकणात आणि देशावर छोटी नाटके, दशावतार आणि व्हरायटी शो सादर होत. कोल्हापूर, सांगली परिसरात व्हरायटी शो करणारी अनेक मंडळे असत. यानिमित्ताने सर्कशीचे तंबू मुक्काम जमवत तर सांगली, तासगाव वगैरे ठिकाणी विसर्जन मिरवणुका व रथयात्रा वैशिष्ट्यापूर्ण असत. काळानुऊप अनेक बदल सर्व क्षेत्रात होताना दिसत आहेत. शालेय गणेश उत्सव बंद झाले आहेत आणि सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुका आणि महाप्रसाद या भोवती घुटमळताना दिसतो आहे. अनेक मंडळे मसाले भात, शिरा वगैरे कऊन महाप्रसाद करतात. झुंडीच्या झुंडी महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नदान हे चांगले असले तरी गणेश उत्सवाचा हेतू समजून घेतला पाहिजे. बुद्धि, कला, विद्या, विचार याचा प्रसार यानिमित्ताने झाला पाहिजे. पण महाप्रसाद आणि मिरवणूक यापलीकडे अपवाद सोडता कुणी वळताना दिसत नाही. मिरवणुकीत कर्णकर्कश्य आवाजामुळे अनेकांचे कान जातात. मिरवणूक मार्गावरील अनेक खिडक्यांची तावदाने तडकतात आणि आवाजाचा हा अतिरेक न झेपल्याने काहींचे कान तर काहींचे प्राण जातात. दरवर्षी हे प्रकार घडतात पण त्यातून आपण काही बोध घेत नाही. बाप्पाच्या कानांना या आवाजाचा किती त्रास होत असेल याचा विचार जरी केला तरी मिरवणुकीत आपली लेझीम पथके, वारकरी भजन पथके, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी, मानवी मनोरे यांची प्रात्यक्षिके सादर कराविशी वाटतील. पण कुठे तरी एखादे मंडळ, हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण, एखादे मंडळ पाककला स्पर्धा, एखादे मंडळ संगीत मैफल असे उपक्रम राबवते. बाकी नुसता धुडगुसच असतो. मिरवणुकीचे पावित्र्य नसते. हे सुधारले पाहिजे. त्यासाठी शासनापासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वानी संबंधित सर्वांना सोबत घेऊन उत्सवाचे महत्त्व समजून मार्गदर्शन केले पाहिजे. आदर्श उभे पेले पाहिजेत. विसर्जन काळात सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर असतो. एक गाव एक गणपती किंवा बाप्पाची ठराविक उंचीची मूर्ती, डॉल्बीवर बंदी वगैरे उपक्रम पोलीस दलाने राबवून बघितले. गणपती कुणाचा मोठा आणि कुणाची मिरवणूक किती तास चालली यातून गणेश उत्सव बाहेर पडायला तयार नाही. विसर्जन मिरवणुकीत आणि गणेश उत्सव काळात काही समाजकंटक आपल्या भाकऱ्या भाजून घेतात. त्यांच्यापासूनही सावध राहिले पाहिजे. याच जोडीला चांगले संकल्प, चांगले उपक्रम आणि पर्यावरण पूरक लोकहितकारी गणेश उत्सव साजरा केला पाहिजे. ‘पुढल्या वर्षी लवकर या’ चा निरोप देताना गणपती बाप्पाने सर्वांना सुब्द्धि द्यावी इतकेच मागणे आहे.