कोल्हापूर विभागांतर्गत 355 केंद्र तर 1 लाख 30 हजार 743 परीक्षार्थी
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून (दि. 2) प्रारंभ होत असून कोल्हापूर जिल्ह्यात 136 परीक्षा केंद्रावर 53 हजार 675 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी 11 वाजता पहिला मराठीचा पेपर होणार असून विद्यार्थ्यांनी 10.30 पुर्वी परीक्षा केंद्रात उपस्थित राहायचे आहे. पालकांच्या मागणीनुसार प्रत्येक पेपला 10 मिनिटे वाढवून दिली आहेत. तरी विद्यार्थ्यांनी निर्भपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव डी. एस. पोवार यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात 355 परीक्षा केंद्रे आहेत. तर तिन्ही जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 743 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळांतर्गत परीक्षेसाठीचे सर्व साहित्य, उत्तरपत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील संकलन केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवल्या आहेत. तेथील परीक्षा कक्षप्रमुखांनी वेळेत उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर वाटप करायच्या आहेत. दहावी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या कामी विभागीय मंडळांतर्गत जवळपास 3 हजार कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून प्रश्नपत्रिका घेवून जाणाऱ्या सहाय्यक परीक्षा नियंत्रकांच्या मोबाईलला ट्रॅकर लावला जाणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत सुरक्षितपणे पाठवल्या जातील, यात शंका नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येवू नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत परीक्षा केंद्र व विद्यार्थी
जिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी शाळा
कोल्हापूर 136 53675 976
सांगली 116 38541 767
सातारा 103 38527 681
एकूण 355 130743 2424
अडचणीच्या केंद्रावरील बैठक व्यवस्था नजिकच्या शाळेत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी परीक्षा केंद्र 4108 राजाराम हायस्कूल कसबा बावडा या परीक्षा केंद्राचे बांधकाम सुरू असल्याने या केंद्राऐवजी बावड्यातील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल व दत्ता बाळ हायस्कूल या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था केली आहे. याची शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव पोवार यांनी केले आहे.