तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन : उद्या महाप्रसाद
वार्ताहर /किणये
गाडे मार्ग, शहापूर येथील संतसेना महाराज समाजोन्नती संघातर्फे संतसेना महाराज यांचा 95 वा पुण्यतिथी सोहळा व सेना महाराज मंदिराचा 71 वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम सोमवारपासून मंदिरात सुरू झाला आहे.
सोहळय़ानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी सायंकाळी पूजेनंतर पोथी स्थापना करण्यात आली. आरती व भजनाने सोहळय़ाला प्रारंभ झाला.
संतसेना महाराजांचे गाडे मार्ग शहापूर येथे मंदिर बांधण्यात आले असून मंदिराचा 71 वा वर्धापन दिन व महाराजांची पुण्यतिथी आचरण्यात येत आहे.
मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 6 वाजता काकड आरती शहापूर येथील नामदेव विठ्ठल मंदिर भजनी मंडळातर्फे होईल. सकाळी 8 वाजता महाअभिषेक, दुपारी 3 वाजता भजन व सायंकाळी 7 वाजता धामणे येथील ह.भ.प. भैरु बाळेकुंद्री महाराज यांचे प्रवचन व रात्री 8 वाजता कल्लेहोळ येथील ह.भ.प. निवृत्ती मुचंडीकर यांचा कीर्तन निरुपणाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 10.30 नंतर कर्ले येथील निवृत्ती भजनी मंडळाचा जागर भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
उद्या महाप्रसाद
बुधवार दि. 24 रोजी या सोहळय़ाचा मुख्य दिवस आहे. सकाळी 6 वाजता काकड आरती होईल. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत नणदी, चिक्कोडी येथील ह.भ.प. भागवत संत महाराज यांचे कीर्तन होईल. व त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
दुपारी 12 ते 3 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री 7 ते 8 या वेळेत सांप्रदायिक, खिरापतीचे भजन होऊन या सोहळय़ाची सांगता होणार आहे. मंगळवारी व बुधवारी सर्व समाजबांधवांनी सलून दुकाने बंद ठेवून या सोहळय़ात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या सोहळय़ाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.