समादेवी गल्लीतील पंत वाडय़ातून मिरवणुकीला सुरुवात
वार्ताहर /सांबरा
श्रीपंत नामाच्या गजरात थोर संतश्रेष्ट व अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 117 व्या पुण्यतिथी उत्सवाला मंगळवारी प्रारंभ झाला. सकाळी 8 वाजता बेळगाव समादेवी गल्लीतील श्रीपंत वाडय़ामध्ये श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते पूजन करून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये कोल्हापूर, सांगली, मिरज, गडहिंग्लज, गोवा, बेळगाव, निपाणी आदी परिसरातील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. प्रेमध्वज मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली.
यावेळी ठिकठिकाणी पालखीचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांसाठी चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. त्यानंतर गांधीनगर, मारुतीनगर, बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्दमार्गे श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीकडे मार्गस्थ झाली. दुपारी 2 वाजता प्रेमध्वज मिरवणूक आमराईतील श्रीपंत स्थानी पोहोचली. यात्रेनिमित्त परगावचे भाविक रात्री उशिरापर्यंत पंत बाळेकुंद्रीत दाखल होत होते. काहीजण पायी चालत श्रीक्षेत्राकडे येत होते. रात्री 8 वाजता श्री पंत मंदिरासमोर श्री घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रेमध्वजारोहण होऊन मुख्य उत्सवाला प्रारंभ झाला.