घरगुती सिलिंडरचे दर मात्र जैसे थे, पेट्रोल-डिझेलही स्थिर पातळीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच 1 एप्रिल रोजी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरची किंमत 92 रुपयांनी कमी केली आहे. राजधानी दिल्लीत आता कमर्शियल सिलिंडरचा दर 2,028 रुपयांवर आला आहे. तथापि, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलो गॅस सिलिंडरचा दर गेल्या महिन्याइतकाच स्थिर ठेवण्यात आला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. जवळपास नऊ महिन्यांपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये, तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर तो दिल्लीत 2,119.50 रुपयांवर पोहोचला होता. त्याचवेळी, 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे दिल्लीत त्याची किंमत 1,103 रुपये झाली होती. आता एप्रिलमध्ये घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवल्यामुळे गृहिणींना महागाईचे चटके सहन करावे लागतील. जून 2020 पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. फक्त उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर मिळणाऱ्या ग्राहकांनाच 200 रुपये अनुदान मिळते. यासाठी सरकार सुमारे 6,100 कोटी रुपये खर्च करते.