83.5 रुपयांनी झाली दरकपात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जून महिन्यातील पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी काही प्रमाणात दिलासा दिला आहे. कंपन्यांकडून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे 83.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या दरकपातीनंतर दिल्लीत कमर्शियल सिलिंडरचा दर 1856.50 रुपयांवरून कमी होत 1773 रुपये झाला आहे. कोलकात्यात यापूर्वी कमर्शियल सिलिंडरकरता 1960.50 रुपये खर्च करावे लागत होते, परंतु आता हाच सिलिंडर 1875.50 रुपयांमध्ये मिळणार आहे. अशाचप्रकारे मुंबईत 19 किलो वजनाचा कमर्शियल सिलिंडर आता 1725 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. पूर्वी मुंबईत याकरता 1808.50 रुपये खर्च करावे लागत होते. चेन्नईत कमर्शियल सिलिंडर 1973 रुपयांना मिळणार आहे. कमर्शियल सिलिंडरचे दर कमी करण्यात आले असले तरीही घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कंपन्यांकडून कुठलेच बदल करण्यात आलेले नाही. यापूर्वी 1 मे रोजी कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर 172 रुपयांनी कमी झाले होते. कमर्शियल गॅस सिलिंडर हे प्रामुख्याने रेस्टॉरंट्समध्ये वापरले जातात. कमर्शियल गॅस सिलिंडरप्रकरणी दिलासा देण्यासह तेल कंपन्यांकडून जेट फ्यूल (हवाई इंधन)च्या दरात कपात करण्यात आली आहे. जेट फ्यूलचे दर सुमारे 6,600 रुपयांनी कमी झाले आहेत. या इंधनदर कपातीमुळे आगामी काळात हवाई प्रवास काही प्रमाणात स्वस्त होऊ शकतो. नवे दर 1 जूनपासून लागू करण्यत आले आहेत.