मंत्री सतीश जारकीहोळी : उळागड्डी खानापूर येथे जाहीर सभा
बेळगाव : मतदारसंघातील प्रत्येक गावाला सुसज्ज रस्ते व पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी मतदारसंघातील उळागड्डी खानापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादामुळे आपणाला मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्या प्रमाणेच आताही प्रयत्न करून गावांच्या समस्या निकालात काढून सुसज्ज रस्ते व पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी प्राधान्य देऊ. तसेच शेतकऱ्यांसाठी शेतवडीतील रस्त्यांचा विकास करून देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी शून्य व्याजदराने कर्ज देण्यात येत आहे. याचा सदुपयोग करून घ्यावा. खासगी सावकारांकडून अधिक व्याज दराने कर्ज काढू नये. कर्ज काढलेच असेल तर आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी उळाग•ाr खानापूर येथील प्राथमिक कृषी संघातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.