शेतकऱ्यांची मागणी : बेळगाव-पणजी महामार्गात शेतजमीन गेलेले शेतकरी अद्याप भरपाईच्या प्रतीक्षेत
खानापूर : बेळगाव-पणजी (गोवा) या नव्याने तयार करण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसानभरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यासह इतर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. तसेच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी खानापूर, हलकर्णी, कौंदल, होनकल, सावरगाळी, गुंजी, माणिकवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, कल्लाप्पा घाडी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याच्या भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांची भेट घेऊन करण्यात आली.
बेळगाव-पणजी, गोवा रस्त्याचे काम सुरू आहे. यात खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन मोठ्याप्रमाणात गेली आहे. हलकर्णी ते खानापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. गेली कित्येक वर्षे शेतकरी नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहे.तसेच काही शेतकऱ्यांचे दावे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू आहेत. मात्र नुकसानभरपाई देण्यात आली नाही. असे असताना बेळगाव-खानापूर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल आकारणीसाठी प्रयत्न चालवले होते. मात्र शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीचा जोर केल्याने सध्या टोल आकारणी बंद करण्यात आली आहे. नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करत शिष्टमंडळाने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सविस्तर माहिती अनुराधा वस्त्रद यांना दिली. तातडीने भरपाई देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी शिवाजी पाटील, राजू पाटील, गुंडू तोपिनकट्टी, गंगाराम गुरव, नारायण गुरव, नामदेव बेळगावकर, रविंद्र गुरव, नितीन पाटील, मारुती सुंठकर, मोहन पाटील, एम. आर. पाटील यासह इतर शेतकरी उपस्थित होते.