अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या पूर्वतयारीच्या बैठकीत त्यांनी वरील सूचना केली आहे. निवास, भोजन, वाहतूक आदी सर्व तयारी पूर्ण करावी. अधिवेशनाच्या काळात मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बेळगावात वास्तव्य असणार आहे. याबरोबरच सुवर्णविधानसौध परिसरात अनेक संस्था, संघटना निदर्शने करतात. आंदोलनाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी व इतर पायाभूत सुविधा पुरविण्याची सूचना केली.
वीजपुरवठा, शामियाना, बॅरिकेड्स, पार्किंग व इंटरनेट सुविधा व्यवस्थितपणे पुरवाव्यात. संबंधित समित्यांच्या अधिकाऱ्यांनी आधीच पाहणी करून सर्व व्यवस्था झाली आहे का, याची खात्री करून घ्यावी. अधिवेशनापूर्वी शहरातील प्रमुख चौकांमध्ये, वीजखांबांवर, झाडांवर व भिंतींवर लावण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक हटविण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शहरातील अनेक ठिकाणी खासकरून भिंती, वीजखांब व झाडांवर कोचिंग सेंटर, खासगी आस्थापने, व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या बेकायदा जाहिराती लावणाऱ्या कंपन्यांना दंड आकारण्याची सूचना पालिका आयुक्तांना करण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांचे वास्तव्य व भोजन व्यवस्थेसंबंधी माहिती दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख वेणुगोपाल आदींसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी उपस्थित होते.