मंगेश तळवणेकर यांच्या प्रयत्नांना यश! उपोषण स्थगित
ओटवणे प्रतिनिधी
कारिवडे गावातील पासधारक शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना माडखोल फुगीपर्यंत एस टी बस मधुन प्रवास करण्यास सवलत देण्याचे तसेच शिरशिंगे तसेच वेर्ले मार्गावर संध्याकाळी ५:१५ च्या सुमारास लवकरच बस सुरू करण्याचे लेखी आश्वासन एस टी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिल्याने विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी बस स्थानकासमोर विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांसह १४ ऑगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन स्थगित केले आहे. दरम्यान कारीवडे गावातील एस टी पासधारक विद्यार्थ्यांचे माडखोल फुगीपर्यंत सवलत मिळण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी मंगेश तळवणेकर यांचे आभार मानले आहेत. तर गेल्या अनेक वर्षांपासूनची विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केल्याबद्दल मंगेश तळवणेकर यांनी एस टी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांचे आभार मानले आहेत.