प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य ग्रंथालय व वाङ्मय चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य ग्रंथालयात दि. 1 ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथी आचरण्यात आली. यावेळी स्वा. सैनिक विठ्ठलराव याळगी यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशातील लोक टिळक यांना भगवान टिळक म्हणत. त्यांनी बेळगाव, चिकोडीला भेट दिली होती. आपल्या घरीसुद्धा ते आले होते. त्यांच्या उपस्थितीत 1906 मध्ये बेळगावमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला, असेही त्यांनी सांगितले. देश पारतंत्र्यात कसा गेला, प्लेगची साथ, टिळकांची निर्भिड पत्रकारिता याबद्दल त्यांनी माहिती दिली.
अध्यक्षस्थानी वाङ्मय चर्चा मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल पाटणेकर होते. किशोर काकडे यांनी अविनाश ओगले यांची टिळक ही कविता सादर केली. माधव कुंटे यांनी त्यांचा परिचय करून दिला. रोहन दळवी यांनी आभार मानले.