पाच वर्षातून एकदा परवाना घेण्याची सूचना, मनपा व्याप्तीतील व्यावसायिकांना आदेश लागू?
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका व्याप्तीमध्ये व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. व्यवसाय परवाना घेतल्यानंतर वर्षातून एकदा नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र यापुढे 1964 च्या कायद्यानुसार 5 वर्षातून एकदाच व्यवसाय परवाना घेण्याची सूचना नगरविकास खात्याने केली आहे. पण या कायद्यानुसार केवळ नगरपंचायत व नगरपालिकांचे कामकाज चालते. त्यामुळे महापालिका व्याप्तीतील व्यावसायिकांना हा आदेश लागू होतो का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिकेचे कामकाज 1976 च्या महापालिका कायद्यानुसार चालते. त्यानुसार महापालिका व्याप्तीमधील व्यावसायिकांना व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच वर्षातून एकदा व्यवसाय परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसारच वर्षातून एकदा व्यवसाय परवाना नुतनीकरण केला जातो. पण अलिकडेच नगरविकास खात्याने पत्रक काढले असून, पाच वर्षातून एकदा व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची मुभा दिली आहे. म्युन्सिपल ऍक्ट 1964 च्या कायद्यानुसार पाच वर्षातून एकदा व्यवसाय परवाना नूतनीकरण करण्याची सूचना केली आहे. पण 1964च्या कायद्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतीचे कामकाज चालते. त्यामुळे या कायद्यानुसार महापालिकेला कामकाज करावे लागणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 1976 च्या कायद्यानुसार सर्व कारभार केला जात असताना केवळ व्यवसाय परवान्यासाठी जुन्या कायद्याचा आधार घ्यावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पाच वर्षातून एकदा व्यवसाय परवाना घेतल्यास पाचही वर्षाचा व्यवसाय परवाना शुल्क एकदाच भरावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना देखील पाच वर्षाकरीता एकदाच व्यवसाय परवाना घेणे खर्चिक आहे. तसेच पाच वर्षानंतर नव्याने व्यवसाय परवाना घ्यावा लागणार आहे. महापालिका कायद्यानुसार वर्षातून एकदा परवाना घेतल्यास एकाच वर्षाचा शुल्क भरावा लागतो. तसेच घरबसल्या नुतनीकरण करता येवू शकते. त्यामुळे व्यवसाय परवान्याचा आदेश बजावला असला तरी कोणत्या पद्धतीने व्यवसाय परवाना घ्यावा हा संभ्रम निर्माण झाला आहे.