मयत झालेल्या व्यक्तींची नावे मतदारयादीत : अर्ज करूनही नावे कमी करण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव ; निवडणुकीवेळी मतदारयादीतील नावांचा घोळ नेहमीच असतो. बऱ्याचदा हयात असलेल्या मतदारांची नावे गहाळ होत असतात. त्यामुळे निवडणुकीवेळी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्याचे आजवर निदर्शनास आले आहे. यावेळीदेखील विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीतील घोळ कायम असल्याचे दिसून येत आहे. मयत व्यक्तींची नावे जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले आहे. घिसाडघाईने राबविण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ नेहमीचाच बनला आहे. निवडणूक आयोगाकडून मतदारयादीबाबत नेहमी सूचना केल्या जातात. वर्षातून एकदा मतदारांची माहिती घेऊन मतदारयादी तयार केली जाते. वर्षभरात मयत झालेल्या किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर झालेल्या मतदारांची नावे यादीतून कमी करणे, 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे दाखल करणे किंवा मतदारक्षेत्र बदलल्यास त्याची नोंद करणे, ही प्रक्रिया करण्यासाठी वर्षातून एकदा मतदारयादी पडताळणी केली जाते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मतदारयादी प्रसिद्ध केली जाते. 2012 पासून आतापर्यंत 11 वेळा मतदारयादीची पडताळणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत दोनवेळा महापालिका निवडणुका झाल्या. तसेच दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक होत आहे. दोनवेळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पण मयत झालेल्या व्यक्तींची नावे कमी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. परशुरामसिंग जमादार हे 23 नोव्हेंबर 2012 रोजी मयत झाले होते. मात्र त्यांचे नाव आजही मतदारयादीतून कमी करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुशिलाबाई जमादार या 22 डिसेंबर 2019 रोजी मयत झाल्या आहेत. त्यांचे नावदेखील मतदारयादीतून कमी केले नाही. मतदारयादीतून नाव कमी करण्यासाठी कुटुंबीयांनी बीएलओंकडे अर्ज केला होता. मतदारयादी पडताळणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडेही याबाबतची माहिती देण्यात आली होती. तरीदेखील आगामी निवडणुकीच्या मतदारयादीत दोघांचेही नाव नोंद झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
मतदारयादी तयार करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा?
मतदारयादीतील घोळाबाबत कायमच तक्रारी होत असतात. मतदान करण्यास गेलेल्या नागरिकांचे नाव मतदारयादीत नसल्याचे अनेकवेळा दिसून येते. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण होतो. मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागते. महापालिका निवडणुकीवेळी काही मतदारांची नावे अन्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आल्याचे दिसून आले होते. बऱ्याच मतदारांची नावे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले होते. मतदारयादी तयार करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दोन महिन्यांपासून कार्यरत आहेत. मतदारयादीला आधार लिंक करण्यासाठी चार महिने मनपाचे कर्मचारी व बीएलओ व्यस्त होते. तरीदेखील मयत मतदारांची नावे मतदारयादीतून कमी केली नाहीत. त्यामुळे मतदारयादी तयार करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळकाढूपणा केला आहे का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.