पत्रकार परिषदेत कौतुक, 1853 च्या लढय़ाचा इतिहास पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळीतील पोर्तुगीजांविरूद्धच्या लढय़ाला राष्ट्रीय युद्ध स्मारक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल कुंकळ्ळीत बुधवारी उशिरा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांचे अभिनंदन करण्यात आले. कुंकळळीच्या 1583 च्या प्रथम लढय़ाच्या 439 व्या स्मृतिदिनानिमित्त या लढय़ाच्या स्मृती आणि सोळा महानायकांच्या शौर्याची गाथा भारतभर पसरविण्यासाठी यंदा 15 जुलै या हुतात्मा दिनी विविध कार्यक्रम आयोजिण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक व स्वातंत्र्यसैनिकाचे सुपुत्र विदेश देसाई यांनी त्यात दिली
यावेळी स्वातंत्र्यसैनिक रोहिदास (दाद) देसाई, स्वातंत्र्यसैनिक सुशिला पडियार, कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल समिती अध्यक्ष ऑस्कर मार्टीन्स, शांतादुर्गा सेवा समितीचे सचिव अभिदीप देसाई, नगरसेवक विशाल देसाई, उद्देश देसाई, राहुल देसाई, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय व भाजप मंडळाचे अध्यक्ष मारुती देसाई तसेच कुंकळळी शिक्षणसंस्थेचे प्रकाश देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. कुंकळळीच्या 1583 च्या लढय़ाचा इतिहास पाठय़पुस्तकात समाविष्ट करण्याची आग्रही मागणी उपस्थित मान्यवरांनी केली. यासंदर्भात नागरिकांतर्फे मुख्यमंत्री सावंत यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे विदेश देसाई यांनी सांगितले.
कुंकळ्ळीच्या लढय़ाचा दिवस राज्यपातळीवर सरकारने आयोजित करावा, अशी मागणी मार्टीन्स यांनी केली. हुतात्मा स्मारकाची जी दुर्दशा झाली आहे ती त्वरित दूर करावी व या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपावे, असे ते म्हणाले. कुंकळळी पालिका मंडळाला हुतात्मा स्मारकाचे पावित्र्य राखण्यात अपयश आले असून स्मारकाचा ताबा हुतात्मा स्मारक समितीकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. स्वातंत्र्यसैनिक रोहिदास देसाई व सुशिला पडियार यांनी मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. कुंकळ्ळीकरांमुळेच पोर्तुगीज सत्तेच्या धर्मांतराला लगाम बसला. कुंकळ्ळीचा लढा हा परकीय सत्तेविरुद्धचा आशिया खंडातील प्रथम लढा असून या लढय़ाला राजमान्यता मिळल्याशिवाय गोवा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पूर्ण होणे शक्य नाही, असे देसाई यांनी सांगितले. त्यांनी सदर लढय़ातील थरारक प्रसंगांची आठवण करून दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली गेली. यात स्वातंत्र्यसैनिक सुशिला पडियार, रोहिदास देसाई, विशाल देसाई तसेच शैलेश प्रभाकर वैद्य, शांतादुर्गा सेवा समितीतर्फे शंकर देसाई, अभिदीप देसाई, अवधुत तवडकर, कुंकळ्ळी एज्युकेशनल सोसायटीतर्फे अध्यक्ष विदेश यशवंत देसाई, सचिव प्रकाश देसाई, विवेक पडियार, स्वातंत्रसैनिकांची मुले तसेच पालिका, पत्रकार आणि अन्य नागरिकांच्या वतीने नारायण देसाई, संतोष नाईक, विनोद देसाई, योगेश देसाई, सुधाकर देसाई, यतीन तळावलीकर, बोमो देसाई, सागर देसाई, सदानंद देसाई, बाळसो देसाई, कमलाक्ष प्रभुगावकर, सुनील फातर्पेकर, चिफ्टन मेमोरियल कमिटीतर्फे ऑस्कर मार्टीन्स व विजयकुमार कोप्रे देसाई आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली.