मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा समावेश असलेल्या बेटिंग अॅपच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला. निवडणूकीची रणधुमाळी सुरु असलेल्या छत्तीसगडमध्ये एका रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमधील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने सट्टेबाजीतील हवाला पैशाचा वापर केल्याचा आरोपही केला.
काही दिवसापुर्वी महादेव अॅप या ऑनलाईन जुगार खेळल्या जाणाऱ्या अॅपच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकून मोठ्या रकमा जप्त केल्या होत्या. तसेच या अॅपच्य़ा प्रवर्तकांनी दुबईमध्य़े मोठा कार्यक्रम घेऊन त्यासाठी बॉलीवूडचे कलाकार आमंत्रित केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी चालु केली होती.
अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या फॉरेन्सिक विश्लेषणानुसार महादेव सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याचा आरोप केला होता. हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तिसगड सरकारवर थेट आरोप करून हे सरकार सट्टेबाजीमध्ये गुंतल्याचा दावा केला.
यावेळी काँग्रेससह छत्तीसगढ सरकारवर आरोप करताना पंतप्रधान म्हणाले, “आम्ही जे बोलतो ते करतो हा भारतीय जनता पक्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. छत्तीसगडची निर्मिती भाजपने केली आहे आणि मी तुम्हाला हमी देतो की भाजप छत्तीसगडला आकार देईल. पण काँग्रेस पक्षाचा ‘झुठ का पुलिंडा’ भाजपच्या समोर उभा आहे. ‘भ्रष्टाचारातून तिजोरी भरणे हेच काँग्रेस पक्षाचे प्राधान्य आहे,” असे भाषणात म्हटले आहे.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “छत्तीसगडमधील काँग्रेस पक्षाचे सरकार तुम्हाला लुटण्याची एकही संधी सोडत नाही…काँग्रेसने ‘महादेव’ या नावालाही सोडले नाही…दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये एक मोठी कारवाई झाली….चलनी नोटांचा मोठा साठा सापडला….लोकांचे म्हणणे आहे की हे पैसे जुगार खेळणाऱ्यांचे आणि सट्टेबाजी करणाऱ्यांचे आहेत. काँग्रेसचे नेते या लुटलेल्या पैशाने आपली घरे भरत आहेत. राज्य सरकारने आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं की त्यांचे दुबईत बसलेल्या लोकांशी काय संबंध आहेत. पैसे जप्त केल्यानंतर बघेल गोंधळून गेले आणि ते जमिनीवर आले,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारादरम्यान केला.