मुकुल वासनिक-पृथ्वीराज चव्हाणांसह 42 पर्यवेक्षक नियुक्त
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बडय़ा नेत्यांना प्रचारव्यवस्थानात नियुक्त केले आहे. पक्षाचे संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यादी जाहीर करत 42 नेत्यांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
या पर्यवेक्षकांमध्ये मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, बी.के. हरिप्रसाद, के.एच. मुनियप्पा यांचा समावेश असून त्यांना क्षेत्रीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. हा पर्यवेक्षक गुजरातच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील घडामोडींवर नजर ठेवणरा आहे. वासनिक यांना दक्षिण गुजरात तर मोहन प्रकाश यांना सौराष्ट्र आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मध्य गुजरात तर हरिप्रसाद यांना उत्तर गुजरातमधील प्रचारव्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजस्थान सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांसह 32 नेत्यांना गुजरातच्या 26 लोकसभा मतदारसंघांच्या अंतर्गत येणाऱया विधानसभा मतदारसंघांसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते शकील अहमद खान, कांतिलाल भूरिया, राजेश लिलोठिया तसेच अन्य काही नेत्यांनाही पर्यवेक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गुजरातच्या एकूण 182 विधानसभा मतदारसंघांपैकी 89 जागांवर पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर उर्वरित 93 मतदारसंघांमध्ये 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
गुजरात निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. काँग्रेसही 27 वर्षांनी राज्याच्या सत्तेवर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. राहुल गांधी हे गुजरातमध्ये दोन प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. तर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत.