दोन कार्यकारी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नेमण्याची तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून सुरू असलेला संघर्ष येत्या काही दिवसात संपुष्टात येणार आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष होण्यास तयार नसल्याचे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता कायमस्वरुपी अध्यक्ष निवडण्यासाठी पुन्हा अंतर्गत वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये ‘एकमत’ होत नसल्यामुळे कार्यकारिणी निवडीसाठी एक नवीन फॉर्म्युला विकसित केला जात असल्याचे समजते. त्यानुसार सोनिया गांधी पुढील 5 वर्षांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी चर्चा आहे. तसेच अध्यक्षांच्या दिमतीला दोन कार्यकारी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष दिले जाऊ शकतात. यापैकी एक कार्याध्यक्ष दक्षिणेतून तर दुसरा उत्तर भारतातून केला जाण्याची शक्मयता आहे. या सूत्रावर पक्षांतर्गत एकमत झाल्याचे दिसून येत आहे. या प्रस्तावाला सर्वसहमती मिळाल्यास नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाऊ शकते.
काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि केरळचे रमेश चेनिथला यांची नावे आघाडीवर आहेत. खर्गे हे सध्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असून लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते राहिले आहेत. दुसरे नाव रमेश चेनिथला यांचे आहे. केरळ विधानसभेत ते विरोधी पक्षनेते राहिले आहेत. ते गांधी घराण्याच्या जवळचे असल्याचेही बोलले जाते.
दुसरीकडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत किंवा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कार्याध्यक्ष बनवले जाऊ शकते. गेहलोत आणि पायलट हे दोघेही उत्तर भारतातील शक्तिशाली चेहरे समजले जातात. गेहलोत हे अनुभवी नेते आहेत. तर सचिन पायलट यांच्याकडे युवावर्गाला जवळ करण्याची ताकद आहे. पक्षातील तरुण चेहरा म्हणून सचिन पायलट यांचे नाव घेतले जात आहे.