ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, धानोरकर यांचं पार्थिव सकाळी एअर ॲम्ब्युलन्सने चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाळू धानोरकर यांचे वडील नारायणरावजी धानोरकर यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर धानोरकर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तात्काळ नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने रविवारी दुपारी बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना नागपुरातून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात आले. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात उपचारादम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चंद्रपुरात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून धानोरकर यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.