प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोवा काँग्रेसच्या वतीने काल सोमवारी सकाळी गौतम अदानींच्या विरोधात मडगाव एसबीआयच्या बाहेर निदर्शने केली. न्यूयॉर्कच्या हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी समूहावर केलेल्या आरोपामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. त्याशिवाय या कंपनीला मोठ्या प्रमाणात एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज दिले आहे.
हा मोठा आर्थिक घोटाळा असून देखील केंद्रीय अर्थमंत्री यावर भाष्य करीत नाही. हा कंपनीशी निगडीत विषय असल्याचे सांगून सारवासारव करीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. या कर्ज व्यवहारामुळे सामान्यांच्या विमा खातेदारांची मोठी रक्कम वापरली गेली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीही निर्माण झाली आहे. अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संबंध असल्याने भाजप सरकार त्यांना वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
अदानी यांना सरकार पाठीशी घालत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एलआयसीने कर्ज दिल्यानंतर आपली बाजू सविस्तरपणे जनतेसमोर मांडलेली नाही. त्यामुळे काँग्रेस देशभर एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांसमोर निदर्शने करत आहे.