भोपाळमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टिका केली. काँग्रेस पक्षाने आपली धोरणे “शहरी नक्षलवाद्यांसाठी” वापरल्याचा आरोप करताना महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यापासून रोखण्यास काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसच आता कोणाकडे आहे? काँग्रेसचा चालवण्याचा ठेका आता काही शहरी नक्षलवाद्यांशी आहे. शहरी नक्षलवादी हे काँग्रेसचे शो चालवतात. हेच प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला वाटत असल्यानेच काँग्रेस जमिनीवर सतत ढासळत आहे.”असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पुण्यातील एल्गार परिषदेनंतर झालेल्या हाय- प्रोफाइल अटकेनंतर भाजपने शहरी नक्षलवाद हा शब्द नियमितपणे वापरला आहे. पुण्यातील भीमा कोरेगाव येथे एल्गार परिषदेनंतर झालेल्या हिंसाचाराशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांचा कथित संबंध तपासताना पोलिसांनी त्यांना शहरी नक्षलवादी म्हटले आहे.