पुणे / प्रतिनिधी :
केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरोधात काँग्रेसकडून भाजपा कार्यालयासमोर ‘भाजपा वॉशिंग मशीन’ व ‘मोदी वॉशिंग पावडर’ नावाने सोमवारी अभिनव आंदोलन करण्यात आले.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, गोपाळ दादा तिवारी, पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. ‘इडी, सीबीआय, इन्कम टॅसचे डाग धुवून मिळतील’, ‘भाजपा वॉशिंग मशीन’, ‘मोदी वॉशिंग पावडर,’ असे फलक उपस्थित कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते. या वेळी भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जोशी म्हणाले, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळणे अशक्य आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआयचा वापर करून भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल.